बोट समुद्रात कलंडली; सुदैवाने पर्यटक बचावले

0
150

>> वास्कोनजीक समुद्रातील दुर्घटना

दोनापावल येथून वास्कोनजीक बेटावर जलसफरीसाठी आलेल्या पाच बोटींपैकी परत दोनापावलला जाताना एक बोट पाण्याच्या जोरदार लाटेत पाण्यात कलंडली. सुदैवाने यातील प्रवासी पर्यटक सुखरुप बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी दोनापावला येथून पर्यटकांना घेऊन पाच बोटी बायणा येथील बेटावर जलसफरीसाठी आल्या होत्या. प्रत्येक बोटीत १० ते १५ पर्यटक होते. आपली सफर आटोपून सदर बोटी दोनापावला येथे परतीच्या मार्गाला लागल्या असता येथील जपानीस गार्डनकडे पोचताच समुद्री पाण्याची जोरदार लाट एका बोटीवर आदळली व ती बोट पाण्यात कलंडली. यातील सर्व प्रवासी पाण्यात पडल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले.

सदर प्रकार इतर बोटीतील पर्यटकांनी व बोटचालकांनी पाहताच त्यांनी आपल्या बोटी तेथे वळवून त्या पर्यटकांना मदतीचा हात देऊन सुखरुप वर काढले. तसेच सदर प्रकार बायणा किनार्‍यावरील बोट मालकांना कळताच त्यांनी सदर कलंडलेली बोट ओढीत बायणा किनार्‍यावर आणली. सुदैवाने या बोटमधील पर्यटकांना कोणत्याच प्रकारची इजा झाली नाही. दैव बलवत्तर म्हणून ते सुखरुप बचावले. नंतर सदर पर्यटकांना दुसर्‍या बोटीतून दोनापावला येथे पाठवण्यात आले.