बाबूश मोन्सेरात विरोधात आरोप निश्‍चितीबाबत आज निवाडा

0
175

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावरील अल्पवयीन युवतीवरील कथित बलात्कारप्रकरणी पणजी जिल्हा व सत्र न्यायालय आज सोमवार ३ जून रोजी आरोप निश्‍चितीबाबत निवाडा जाहीर करणार आहे.

या कथित बलात्कार प्रकरणाच्या निवाड्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अल्पवयीन य्ुवतीवरील बलात्कार प्रकरणी आमदार मोन्सेरात यांच्यावर आरोप निश्‍चितीबाबत युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने या प्रकरणाचा निवाडा राखून ठेवलेला आहे.
वर्ष २०१६ मध्ये एका अल्पवयीन मुलीने माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. गोवा महिला पोलीस विभागाने या प्रकरणी मोन्सेरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला या प्रकरणी अटक करून जामिनावर सुटका केली होती. पोलिसांनी जुलै २०१८ मध्ये न्यायालयात मोन्सेरात याच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
आपल्या सावत्र आईने मोन्सेरात यांच्याशी हातमिळवणी करून आपणाला त्यांना विकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर आपणावर बलात्कार करण्यात आला, अशी तक्रार पोलीस स्टेशनवर नोंदविली.

बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या त्या युवतीने तपासाच्या वेळी सहा वेळा आपली जबानी बदलली आहे. त्यामुळे तिच्या वक्तव्यावर विश्‍वास ठेवला जाऊ शकत नाही. न्यायालयासमोर सुध्दा दोन वेगवेगळे जबाब दिलेले आहेत. त्या युवतीच्या वयाबाबत सुध्दा वाद आहे. या कथित बलात्कार प्रकरणातून मोन्सेरात याची सुटका करावी, अशी याचना मोन्सेरात यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे.