बांबोळीत १० रोजी नरेंद्र मोदींची सभा

0
188

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० एप्रिल रोजी पणजीत जाहीर सभा होणार असून ती दुपारच्या वेळी होणार असल्याने लोकांना रणरणत्या ऊन्हात बसावे लागू नये यासाठी आम्ही ही सभा बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

मोदी यांच्या या सभेला राज्यभरातून सुमारे ३० हजार लोक हजर राहणार असून त्यामुळे इनडोअर स्टेडिएममध्ये जागा मिळू न शकणार्‍या लोकांसाठी स्टेडियमबाहेर एक भव्य शामियाना घालण्यात येणार आहे. तेथे एक स्क्रीन बसवण्यात येणार असून त्यावरून लोकांना मोदी यांचे भाषण ऐकता येईल, असे श्री. नाईक यांनी स्पष्ट केले.

खाण अवलंबित
आमच्याच बाजूने
दरम्यान, राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यास सरकारला अपयश आले असले तरी खाण अवलंबित भाजपच्याच पाठीशी राहतील, असा विश्‍वास त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी व्यक्त केला. राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग भाजप सरकार परत सत्तेवर आल्यानंतर सुरू करील, याची खाण अवलंबितांना खात्री असल्याचे श्री. नाईक यावेळी म्हणाले.

अरविंद केजरीवाल
१३ रोजी गोव्यात
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १३ एप्रिल रोजी गोव्यात जाहीर सभा होणार असल्याची माहिती काल पक्षाचे निमंत्रक एल्विस गोम्स यांनी दिली. श्री. केजरीवाल यांची जाहीर सभा मडगाव येथील लोहिया मैदानावर संध्याकाळी ४. वा. होणार असल्याचे ते म्हणाले. उत्तर गोव्यात केजरीवाल यांची जाहीर सभा होणार नाही. मात्र, उत्तर गोव्यात त्यांचा दौरा होणार असल्याचे श्री. गोम्स यांनी स्पष्ट केले.