फिलिपे, सॅम्स, मेरेदिथ नवीन चेहरे

0
337

>> इंग्लंडविरुद्धच्या वनडे व टी-ट्वेंटींसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

ऑस्ट्रेलिया सरकारने आपल्या पुरुष क्रिकेट संघाला काल शुक्रवारी इंग्लंडमध्ये जैव सुरक्षित वातावरणात मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांसाठी परवानगी दिली. ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये ३ वनडे व ३ टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे.

जुलै महिन्यात हा दौरा प्रस्तावित होता. परंतु, कोरोनामुळे दौरा पुढे ढकलावा लागला होता. ऍरोन फिंच याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल सहा महिन्यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. या दौर्‍यासाठी निवडण्यात आलेल्या संघात ग्लेन मॅक्सवेल, नॅथन लायन व मार्कुस स्टोईनिस यांचा समावेश करण्यात आला असून आघाडी फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजा व ट्रेव्हिस हेड यांना बाहेर बसवण्यात आले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या सरकारकडून सर्व आवश्यक परवानग्या मिळविल्या असून दौर्‍यावरून परतताच सर्व खेळाडू १४ दिवस स्वयंअलगीकरण करणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ पर्थ येथून २३ ऑगस्ट रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. सर्वप्रथम ४, ६ व ९ सप्टेंबर रोजी तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होईल. यानंतर ११, १३ व १६ सप्टेंबर रोजी मँचेस्टर येथे तीन वनडे सामने होतील. इंग्लंड सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ऑस्ट्रेलियाचा क्वारंटाईन कालावधीतून सूट देण्यात आलेल्या देशांमध्ये समावेश आहे. त्यामुळे खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ डर्बी येथे चार सराव सामने खेळणार असून यात तीन टी-ट्वेंटी व एका वनडे सामन्याचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या २१ सदस्यीय संघात जोश फिलिपे, डॅनियल सॅम्स व रायली मेरेदिथ या तीन नवोदितांचा समावे केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा टी-ट्वेंटी व वनडे संघ ः ऍरोन फिंच (कर्णधार), शॉन एबॉट, ऍश्टन एगार, आलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रायली मेरेदिथ, जोश फिलिपे, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीवन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कुस स्टोईनिस, अँडी टाय, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर व ऍडम झंपा.