पूरग्रस्तांसाठी १७० कोटी रु.ची केंद्राकडे मागणी करणार ः मुख्यमंत्री

0
110

 

राज्यातील पूरग्रस्तांसाठी गोवा सरकार केंद्राकडे १७० कोटी रु. ची मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. ईडीसीचे चेअरमन सदानंद शेट तानावडे यांनी काल मुख्यमंत्री आपत्ती निधीला दिलेला ५० लाख रु. चा धनादेश काल आपल्या कार्यालयात स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री आपत्ती निधीतून आतापर्यंत २.५ कोटी रु. ची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे, असे सावंत यांनी सांगितले. राज्यातील भात शेती लागवड करणारे शेतकरी व बागायतदार यांचे पुरामुळे मोठे नुकसान झालेले आहे. विशेष करून केळी बागायती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेल्या आहेत. त्याशिवाय अन्य प्रकारची पीके घेणारे बागायतदार यांचेही मोठे नुकसान झालेले आहे.

त्याशिवाय घरात पाणी घुसल्याने लोकांचे मोठे नुकसान झालेले असून काही जणांची मातीची घरे कोसळली आहेत. या सर्व लोकांना नुकसान भरपाई देण्यासाठी आपले सरकार केंद्र सरकारकडे १७० कोटी रु. च्या पॅकेजची मागणी करणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री मदत निधीतून राज्यातील ८०० शेतकर्‍यांना १.५ कोटी रु. च्या नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले.