पाकला दणका

0
137

सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट कारवाईच्या आठवणी पुन्हा ताज्या करीत भारताने पुन्हा एकवार पाकिस्तानला चार थपडा लगावल्या. भारत – पाक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या पदराखाली दडून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचे किमान चार तळ भारतीय सेनेने तुफानी हल्ले चढवून उद्ध्वस्त केले आहेत. अर्थातच बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतीय हद्दीमध्ये नागरी वस्त्यांवर गोळीबार करण्याची जुनी रीत अवलंबण्यात आली. नियंत्रण रेषेवरील या धुमश्चक्रीतून दोन्ही देश पुन्हा एकवार एकमेकांच्या समोर सशस्त्र संघर्षाच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मतदान होण्याच्या आधल्या दिवशी रात्री ही कारवाई झाल्याने कॉंग्रेसने या कारवाईबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित केली, परंतु अशा प्रकारची कारवाई जेव्हा होते, तेव्हा मुख्यत्वे तिचा काळ नि वेळ लष्कर ठरवत असते. त्यामुळे या कारवाईला राजकीय परिमाण देऊन कॉंग्रेसने पुन्हा एकवार स्वतःच्याच पायांवर धोंडा मारून घेण्याची घोडचूक केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयांमध्ये कॉंग्रेस नेहमी पाकिस्तानची कड घेते असे चित्र यातून निर्माण होते याचे भानही कॉंग्रेस नेतृत्वाला उरत नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवाद्यांनी पुन्हा जमवाजमव चालवलेली असल्याच्या बातम्या बर्‍याच काळापासून येत होत्या. ज्या बालाकोटच्या तळावर हवाई हल्ला झाला, त्या ठिकाणी देखील पुन्हा दहशतवाद्यांचा वावर सुरू झाल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेली आहे. मध्यंतरी पाकव्याप्त काश्मीरमधून नियंत्रण रेषेच्या दिशेने लोकांच्या झुंडीच्या झुंडी नेण्याचा प्रयत्न तेथील भारतविरोधी शक्तींनी केला. ‘आता श्रीनगरला जाऊनच नाश्ता करू’ अशा फुशारक्याही त्या जमावाच्या म्होरक्यांनी मारल्या, परंतु प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करण्याचा असा कोणताही प्रयत्न करणे म्हणजे मरणाला सामोरे जाणे ठरेल आणि भारत तशा प्रकारचा कोणताही प्रयत्न तीळमात्र सहन करणार नाही हे पाकिस्तानी नेतृत्वाला पुरेपूर ठाऊक होते. त्यामुळे वेळीच त्या जमावाला रोखण्यात आले. परंतु भारतविरोधी भावना धुमसत ठेवणे ही पाकिस्तानची गरज आहे. गेली सत्तर वर्षे हेच चालले आहे, कारण भारत किंवा काश्मीरसारखे मुद्दे नसतील तर पाकिस्तान एकसंध ठेवण्यासाठी दुसरा कोणताही मुद्दा त्यांच्या हाताशी नाही. गिलगीट बाल्टिस्तानपासून बलुचिस्तानपर्यंत सर्वत्र पाकिस्तानपासून फुटून निघण्यात हित असल्याचे तेथील जनतेला अधिकाधिक जाणवत चालले आहे. पाकिस्तान कर्जबाजारी होत चाललेला आहे, त्यामुळे रोजचे जगणे खडतर होत चालले आहे, इतकेच नव्हे तर नुकतेच, दहशतवाद्यांची आर्थिक रसद तो बंद करू शकलेला नसल्याने फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) त्याला काळ्या यादीत टाकण्याचे पाऊल टाकता टाकता राहिले. अर्थात, पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा त्या आंतरराष्ट्रीय कृतीदलाची बैठक होईल, तेव्हा आपण दहशतवाद्यांची आर्थिक रसद आवळल्याचे पाकिस्तानला सिद्ध करता आले नाही, तर काळ्या यादीत जावे लागणे अटळ असेल. म्हणजेच कडक आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्बंधांचा सामना पाकिस्तानला करावा लागू शकतो. काश्मीरच्या प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत तो किती अपयशी ठरला हे तर गेल्या काही दिवसांत दिसलेच आहे. मलेशिया आणि तुर्कस्थान वगळता एकही देश पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला नाही. चीनने देखील आपली भाषा बदलली. मलेशिया आणि तुर्कस्थानला त्यांच्या पाक समर्थक भूमिकेची किंमत लगोलग चुकवावी लागली आहे. पंतप्रधान मोदींनी तुर्कस्थानचा दौरा रद्द केला, मलेशियातून भारतात मोठ्या प्रमाणावर होणारी पाम तेलाची आयात भारतीय व्यापार्‍यांनी बंद करून इंडोनेशियातून आयात चालू केली, भारतीय नौदलासाठी जहाजे बांधणार्‍या एका तुर्की कंपनीचे कंत्राटही भारत सरकारने रद्दबातल केले. भारताच्या विरोधी भूमिका घेण्याची काय किंमत चुकवावी लागते हे त्यातून त्या दोन्ही देशांना एव्हाना कळून चुकले असेल. पाकिस्तान समर्थित दहशतवादाचे घाव भारत यापुढे मुकाट सोसणार नाही हा संदेश भारत पुन्हा पुन्हा कणखरपणाने देतो आहे, परंतु पाकिस्तान जर त्यातून सुधारू इच्छित नसेल आणि आपल्या भारतविरोधी नीतीलाच पुढे सुरू ठेवू इच्छित असेल, तर आजवर जागतिक महासत्ता भारताविरुद्ध वापरण्यासाठी मदत करीत आल्या तशा यापुढे येणार नाहीत, कारण भारत ही एक मोठी बाजारपेठ हळूहळू खुली होत चाललेली आहे आणि तिच्याशी हातमिळवणी करणेच अधिक लाभदायक आहे याची जाण आता त्यांना येऊ लागली आहे! परंतु पाकिस्तान हे मान्य करणे शक्य नाही, कारण गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारताविरुद्धचे जहर तेथील समाजमानसामध्ये या लोकांनी एवढे भिनवून ठेवलेले आहे, की उद्या भारतासंदर्भात मैत्रीचा हात पुढे करणार्‍या राजकीय नेतृत्वाला उखडून फेकून दिल्याशिवाय ते लोक राहणार नाहीत. इम्रान सध्या सत्तेवर आला आहे तोच आयएसआयच्या पाठिंब्यावर. त्यामुळे त्यामागे फरफटत जाणे त्याला भाग आहे!