पणजी विधानसभा मतदारसंघासाठी १९ मे रोजी पोटनिवडणूक जाहीर

0
148

दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघात येत्या १९ मे रोजी पोट निवडणूक घेण्यात येणार आहे.
पर्रीकर यांचे गेल्या १७ मार्च रोजी निधन झाले होते. त्यामुळे २३ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा आणि विधानसभेच्या तीन पोट निवडणुकीच्या वेळी पणजी मतदारसंघात पोट निवडणूक घेण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. निवडणूक आयोगाने गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातील सहा विधानसभांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर केला आहे.

पणजी पोट निवडणुकीसाठी २२ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज २९ एप्रिल पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. ३० एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. २ मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

पणजी मतदारसंघात २२४८२ मतदार असून ३० मतदान केंद्रे आहेत. पोट निवडणुकीसाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक मशीन आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. त्यात पुरुष १०६९७ आणि महिला ११७८५ मतदारांचा समावेश आहे. जानेवारी २०१९ नंतर मतदारांच्या संख्येत २३८ एवढी वाढ झाली आहे.

निवडणूक लढविण्याचा
मोन्सेरातांचा पुनरुच्चार
माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पणजी पोट निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्याचा पुनरुच्चार पत्रकारांशी बोलताना काल केला. मोन्सेरात हे गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाने पाठिंबा दिल्यास त्याचे स्वागत केले जाईल, असेही मोन्सेरात यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले. गोवा फॉरवर्ड या पक्षाचा राज्यातील आघाडी सरकारमध्ये सहभाग आहे. या पक्षात राहून पोट निवडणूक लढविणे शक्य नाही. सरकारमध्ये राहून निवडणूक लढविल्यास गोवा फॉरवर्डची स्थिती मगो पक्षासारखी होण्याची भिती आहे. त्यामुळे गोवा फॉरवर्डचा राजीनामा देणे योग्य आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.

भाजपचे उमेदवार म्हणून स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पल यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची मागणी पर्रीकर यांचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पर्रीकर यांच्या दोन्ही पुत्रांनी राजकीय वारसा पुढे चालविण्याचे जाहीर केले आहे.
पणजी पोट निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. तसेच, माजी मंत्री मोन्सेरात यांना उमेदवारी किंवा पाठिंबा देण्याबाबत विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पणजीत मुदतीआधीच
दुसर्‍यांदा पोटनिवडणूक
गोवा विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीनंतर पणजी विधानसभा मतदारसंघात दुसर्‍यांदा पोट निवडणूक होत आहे. विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत पणजी मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर निवडून आले होते. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने त्यावेळी केंद्रात संरक्षणमंत्रिपदी असलेल्या मनोहर पर्रीकर यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यात आली. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासाठी पणजीचे आमदार कुंकळ्येकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये झालेल्या पणजीत पोट निवडणुकीत मनोहर पर्रीकर विजयी झाले होते.