चातुर्मास ः एक आनंददायी पर्व

0
205
  •  नारायणबुवा बर्वे
    (वाळपई)

कोरोना महामारी घालवण्यासाठी भारतासह जगामध्ये हेच भारतीयत्व वापरणे सुरू आहे. शरीर, मन, परिसर स्वच्छ राखणे आणि चातुर्मास पाळणे हेच आहे सोवळे-ओवळे म्हणजेच सामाजिक अंतर राखणे आणि
काही काळ मौन राखले म्हणजे मुखावरण. मास्क म्हणजे एका अर्थाने सक्तीचे चातुर्मास व्रत चालू आहे.

आपले हिंदू वर्ष चैत्र प्रतिपदेपासून सुरू होते. फाल्गुन अमावस्येला संपते. सहा ऋतू दोन अयने असे एकूण कालचक्र असते. वर्षभरात अनेक सण- व्रतं- उत्सव आपण साजरे करतो. पण जास्तीत जास्त सण- उत्सव हे चातुर्मासातच असतात. याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर याचे कारण आपल्या लक्षात येते की चातुर्मास हा शब्द योग्य आहे. परंपरेने चातुर्मास किंवा चातुर्मास्य म्हटले जाते.
आषाढ शु. एकादशी ते कार्तिक शु. द्वादशी हा त्याचा कालावधी आहे. आपल्या ऋषिमुनींनी, शास्त्रकारांनी, स्मृतीकारांनी हा कालावधी ठरविण्याचे कारण म्हणजे हे चार महिने पावसाळ्याचे असतात. ब्रह्मदेवाचे नवनिर्मितीचे काम जोमाने चालू असते. पालनकर्त्या विष्णूचे काम मंद होते व ते शेषावर शयन करतात अशी कल्पना केलेली आहे. म्हणून चातुर्मास सुरू होताना येणार्‍या एकादशीला शयनी एकादशी असे नाव आहे. हे एक कारण.

दुसरे कारण म्हणजे उन्हाळ्यातील सर्व पिकं हातात आलेली असतात. नवीन पेरणी झालेली असते. त्यामुळे थोडासा विश्रांतीचा काळ. प्रवास कमी. सर्व माणसं घरातच. पूर्वी लहान ७-८ वर्षांची मुले सोडल्यास मुले मुळी गुरुकुलात, काम कमी. देव झोपलेले त्यामुळे माणसे थोडी शारीरिकदृष्ट्या आळसावलेली…, मानसिकदृष्ट्या मरगळलेली, भूक मंदावलेली… अशी संधी साधून राक्षसी वृत्ती, तामसी वृत्ती उफाळेल… माणसं आजारी पडतील… सर्वत्र गोंधळ होईल म्हणून शास्त्रज्ञांनी ही चातुर्मास कल्पना रुजवली.
दुसरे म्हणजे उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. पूर्वी विवाहादी कार्ये दक्षिणायनात होत नसत.

समाज भक्तिमार्गाकडे वळावा, विश्रांतीचा काळ मार्गी लागावा व सुखाचे दिवस यावे म्हणून व्रत, दान, तप, यज्ञ, पुराण श्रवण, भजन, कीर्तन जेणे करून परमार्थ साधावा व प्रपंच सुखाचा व्हावा. परमार्थाच्या आड येणार्‍या गोष्टींचा त्याग; प्रपंचाच्या आड येणार्‍या गोष्टींचा नाश व्हावा म्हणून व चार महिने आनंदात जावे हा हेतू! आषाढी एकादशीपासून व्रतं सुरू होतात. एकादशी, वामन द्वादशी, गुरुपौर्णिमा, कर्कसंक्रांती, दक्षिणायन सुरू होते व नंतर श्रावण महिना म्हणजे तर सणांचा सुकाळच. बहुतेक सण याच महिन्यात आहेत. यामध्ये विज्ञान, पर्यावरण, वृक्षसंगोपन, सामाजिक बांधीलकी, नात्यागोत्यातील संबंध दृढ होणे, निसर्गातील पशू-पक्षी यांची जवळीक यामध्ये आहे. त्याशिवाय भौतिक विषय दूर ठेवून संयम पाळायला; विषयसुखाशिवायही जीवन आनंदमय होऊ शकते हे शिकवणारे काही नियम, नेम सांगितले. जपयज्ञ, ज्ञानयज्ञ, एखाद्या वस्तूचा त्याग, नामयज्ञ, एकभुक्त (एकदाच जेवणे), मिश्र भोजन (सर्व पदार्थ एकत्रित करून खाणे), अयाचित भोजन (एकदाच वाढलेले जेवणे, परत जिन्नस घ्यायचा नाही), पानावर जेवणे (ताटात जेवायचे नाही), मौन भोजन (बोलायचे नाही), पदार्थ त्याग (एखादा पदार्थ सोडणे), बाकी- रोज नमस्कार घालणे, दिवसातून काही वेळ मौन राखणे, एकशय्या शयन, दररोज काही दान-धर्म… असे करता येते.
व्रतवैकल्ये तर श्रावण महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत असतात. श्रावण आदित्य पूजन, सोमवार शिवामूठ, शिवपूजन उपवास, मंगळागौरी पूजन, बुध बृहस्पती पूजन, गुरुवारी दत्तपूजन, शुक्रवारी महालक्ष्मी पूजन, शनिवार अश्‍वत्थ मारुती पूजन… याशिवाय नागपंचमी, वर्णषष्ष्ठी, शीतला सप्तमी, शु. आणि वद्यशितळा देवीचे पूजन- ही देवी गाढवावर बसून येते. हातात सूप व खराटा घेऊन आहे. या दिवशी फक्त एकच दिवस शिळे खाल्ले तर चालते (आता फ्रीज संस्कृतीमुळे रोजच आम्ही शिळे खातो). गोकुळाष्टमी, तसेच वर्षातून एकदाच करायला मिळणारे वरदलक्ष्मी व्रत हे श्रावणातल्या दुसर्‍या शुक्रवारी असते. राखीपौर्णिमा – भाऊबहिणीचे पवित्र नाते जपणारे, समुद्राची पूजा- नारळी पौर्णिमा. पिठोरी अमावस्या- पोळा (हा सण गोव्यात होत नाही). श्रावण महिना संपतो.

भाद्रपद महिन्यात हरितालिका पूजन, गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, बलराम जयंती, मुक्ता भरणी व्रत, ज्येष्ठागौरी पूजन, वामन जयंती, अनंत चतुर्दशी… ही व्रते असतात. नंतर महालय श्राद्ध, अविधवा नवमी, सर्वपित्री अमावस्या. नवरात्री- घटस्थापना, ललिता पंचमी, महालक्ष्मी पूजन, सरस्वतीपूजन, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, गुरूद्वादशी, धनत्रयोदशी, दिवाळी, लक्ष्मी कुबेर पूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, कुष्मांड नवमी, प्रबोधिनी एकादशी या दिवशी चातुर्मास्य समाप्ती होते पण काही भागात त्रिपुरी पौर्णिमेने चातुर्मास समाप्ती मानली जाते.

चातुर्मासामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. घरी व्रतवैकल्ये, त्यामुळे फिरणे कमी. यामुळे आहार घेताना काही बंधने पाळावीत, असेही सांगितले. काही पदार्थ खाण्याचे टाळावे तर काही आवर्जून खावेत. आज तर या गोष्टी कटाक्षाने पाळायला पाहिजे. आज सर्वच फळे, भाज्या नेहमी मिळतात. पण त्या त्या हंगामामध्ये तयार होणारी भाज्या-फळे त्या-त्या कालावधीमध्ये खाणे आरोग्यशास्त्रानुसार योग्य असते. म्हणून या चार महिन्यात आवळे, चिंच, ऊस, कलिंगड, आंबा, अळुमाडी, काही कंदमुळे, कणगी, करांदा, कोन, कांदा, लसूण हे चातुर्मासात खाऊ नये. चातुर्मास समाप्तीचे दिवशी मुद्दाम खावे व खायला सुरुवात करावी.
या काळातील पक्वान्नेसुद्धा पौष्टिक करावी कारण ती खाल्ली जाणे आवश्यक असते म्हणून एकाएका व्रताशी त्याची सांगड घातली आहे- जसे रविवार पूजन व नागपंचमीला पातोळ्या, मुठळी, उकडीचे मोदक, नारळी भात, गूळ-खोबरे-दुधाची खीर. तसेच काही विशिष्ट पालेभाज्या पावसाळ्यात निसर्ग निर्मित- तेरेकुत, कुरडई, तायकिळा… तसेच या हंगामात होणार्‍या दोडकी, भेंडी, दुधी भोपळा, काळभोपळा या भाज्या अवश्य खाव्या. धान्यामध्ये पावटे, मटकी, मसूर ही धान्ये खाऊ नये.

खरे म्हणजे चातुर्मास सुरू झाल्यापासूनच स्वच्छता सुरू. म्हणून आषाढ अमावस्येला दिवे स्वच्छ करून ठेवले जातात. याला दिव्यांची अमावस्या म्हणतात. पूर्वी चातुर्मासात काही समाजात कांदा अजिबात खात नसत. म्हणून आ. शु. नवमीला कांदेनवमी म्हणतात. त्यादिवशी कांद्याचे पदार्थ करून खायचे व त्यानंतर कांदा खायचा नसतो.

बहुतेक व्रते या चातुर्मासातच येतात. या व्रतांमागे विज्ञान, पर्यावरण, स्वच्छता, निसर्ग जोपासना, पशुपक्ष्यांशी कृतज्ञता, आरोग्य चांगले राखणे या गोष्टी प्रामुख्याने येतात. कारण या व्रतांच्या पूजेमध्ये मुख्यतः झाडांची पत्री, वाळू, माती, इत्यादींचा वापर केला जातो. रानावनात गेल्याशिवाय काही पत्री सापडत नाही. बाकी फुलझाडांची पत्री मिळते. शमी, अशोक, अर्जुन, कदंब, किंवा काही वृक्ष गोव्यात नाहीत. रानात जाऊन पूर्वी लोक वाघचपको, घोड्याचे पाय, सीतेचे पोहे अशी पत्री-फुले आणत. पण आता टीव्ही व मोबाइलमुळे घरातून बाहेर पडत नाही. त्यामुळे उदाहरणादाखल दोन-तीन नावे सांगितली. गणेश चतुर्थीला माटवीला बांधण्यासाठी रानातील अनेक फळे-पाने आणली जात. आता खेड्यातसुद्धा बाजारातून विकत आणून बांधतात. विक्री करणारे हव्यासापोटी झाडेच तोडतात. त्यामुळे वनांचा र्‍हास होतो.

याशिवाय चातुर्मासात जुन्या काळात राम विजय, हरिविजय, पांडव प्रताप, शिवलीला, जैमिनीअश्‍वमेध, नवनाथ कथासार असे ग्रंथ वाचले जात व लोक ऐकत. एखादाच शिकलेला असे त्याने वाचायचे आणि दुसर्‍याने अर्थ सांगायचा. त्यामुळेच अजून पुराणकथा आजच्या पिढीपर्यंत पाठ आहेत. पण आज मात्र हे ग्रंथवाचन बंदच आहे. भजन-कीर्तन कुठेतरी चालू आहे. व्रताच्या मागच्या संकल्पना लोप पावल्या. केवळ कर्मकांड म्हणून व्रत, उपवास चालू आहेत. पण त्यामागची पूर्वसुरींनी योजलेली संकल्पना लक्षात घेऊन आपल्या भारतीय विचारधारेचे उदात्त रूप, त्यामागे असलेली मानसिक, शारीरिक स्वच्छता, ‘शरीरमाद्यं खलू धर्मसाधनम्’ हे तत्त्व सार्थ करणे आवश्यक आहे.

कोरोना महामारी घालवण्यासाठी भारतासह जगामध्ये हेच भारतीयत्व वापरणे सुरू आहे. शरीर, मन, परिसर स्वच्छ राखणे आणि चातुर्मास पाळणे हेच आहे सोवळे-ओवळे म्हणजेच सामाजिक अंतर राखणे आणि
काही काळ मौन राखले म्हणजे मुखावरण. मास्क म्हणजे एका अर्थाने सक्तीचे चातुर्मास व्रत चालू आहे. बाहेर फिरणे नाही. मग आपण नामयज्ञ, जपयज्ञ, ज्ञानयज्ञ, ध्यानधारणा, उपासना केली तर पूर्वजांनी चातुर्मास पाळण्याची जी संकल्पना आपल्याला दिली ती आचरण्यात आणण्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल.