खासदारकीच्या कारकीर्दीत उत्तर गोव्याचा सर्वांगीण विकास

0
217

>> श्रीपाद नाईक यांचा पत्रकार परिषदेत दावा

आतापर्यंतच्या चार वेळेच्या आपल्या खासदारकीच्या कारकीर्दीत उत्तर गोव्यात १ हजार विकास प्रकल्प पूर्ण केले आहे. त्यामुळे उत्तर गोवा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केल्याचे श्रीपाद नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. काल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नाईक यांनी आपण केलेल्या विकासकामांचा अहवाल पत्रकारांसमोर ठेवला.

२०१४ ते २०१९ या काळात ३२२ प्रकल्प प्रस्तावित केले. त्यापैकी २१७ प्रकल्प यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. ३८ प्रकल्प येत्या दोन महिन्यांच्या काळात पूर्ण होणार आहेत. तर उर्वरित ६७ प्रकल्प येत्या २ महिन्यात पूर्ण होणार आहेत. ५ वर्षांत २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. व्याजासकट तो २६.८५ कोटी रु. एवढा झाला. हा सगळा निधी विकासकामांवर खर्च करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.
धारगळीत योग, निसर्गोपचार केंद्र
आयुष मंत्रालयातर्फे धारगळ येथे योग व निसर्गोपचार केंद्र सुरू करण्यात येणार असून १३ नोव्हेंबर रोजी त्यासाठीची पायाभरणी करण्यात आली. या केंद्रात इस्पितळाची सोय असेल तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोय असणार असून योगाचा अभ्यासक्रमही शिकवला जाणार आहे अशी माहिती यावेळी श्री. नाईक यांनी दिली.
आयुष मिशनतर्फे दोन इस्पितळे
दरम्यान, ‘आयुष मिशन’तर्फे दोन आयुर्वेदिक इस्पितळे उभारण्यात येणार असून त्यापैकी एक उत्तर व एक दक्षिण गोव्यात उभारले जाणार आहे. हा प्रकल्पही आपल्या मागच्या म्हणजे आपण आयुष मंत्री असताना धसास लावल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. खासदारकीच्या काळात आपण ८० समाज सभागृहे व ७० स्मशानभूमी प्रकल्प पूर्ण केल्याची माहितीही श्री. नाईक यांनी दिली.

शाळांना संगणक, संबंधित साहित्य
खासदार झाल्यापासून राज्यभरातील शाळांना खासदार निधीतून संगणक व संबंधित साहित्य दिले. त्याशिवाय शववाहिका, विशेष लोकांना चारचाकी सायकली व कृत्रिम अवयव, गरजूंना स्कूटर्स, शैक्षणिक संस्थांसाठी साहित्य, इस्पितळाना रुग्णवाहिका, व्यायामशाळांना उपकरणे, ओबीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या असे साहित्य वेगवेगळ्या उपक्रमाखाली दिल्याचे श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले. सगळा अहवाल आपण जनतेपुढे ठेवत असून जनता आपल्या पाठीशी उभी राहील, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

१३ विधानसभा मतदारसंघात
प्रचार पूर्ण
आतापर्यंत १३ विधानसभा मतदारसंघात प्रचार पूर्ण झाला असल्याचे नाईक म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, आमदार प्रवीण झांटये, पक्षाचे उपाध्यक्ष अनिल होबळे, माजी आमदार व पक्ष प्रवक्ते दामू नाईक व गोविंद पर्वतकर हे हजर होते.