खड्‌ड्यांबाबत कृती आराखडा दोन दिवसांत सादर करा

0
101

>> न्यायालयाचा सरकारला आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला रस्त्यांवरील खड्‌ड्यांबाबत दोन दिवसात कृती आराखडा सादर करण्याचा निर्देश काल दिला. रस्त्यांवरील खड्‌ड्यांबाबतच्या याचिकेवरील पुढील सुनावणी उद्या बुधवारी घेतली जाणार आहे.

राज्यातील रस्त्यावरील खड्डे गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आश्‍वासन देऊन सुद्धा रस्त्यावरील खड्डे कायम असल्याने संताप व्यक्त होत आहे. आम आदमी पक्षाचे सरचिटणीस प्रदीप पाडगावकर यांनी रस्त्यावरील खड्‌ड्यांबाबत एक जनहित याचिका गोवा खंडपीठात दाखल केली आहे.

राज्य सरकारने रस्त्यावरील खड्‌ड्याच्या दुरुस्तीबाबत प्रतिज्ञापत्रातून सविस्तर माहिती सादर करण्याची ग्वाही मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात दिली होती. तथापि, सोमवारच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागितला. न्यायालयाने दोन दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कृती आराखडा सादर करण्याचा निर्देश दिला आहे, अशी माहिती आपचे सरचिटणीस पाडगावकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील एका उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गतवर्षी अशाच प्रकारच्या एका स्वेच्छा याचिकेवर दिलेल्या निवाड्याची प्रत न्यायालयात सादर करण्यात आली आहे. न्यायालयाने आपल्या निवाड्यात अनेक निर्देश दिलेले आहेत, असेही पाडगावकर यांनी सांगितले. याचिकादार पाडगावकर यांच्यावतीने ऍड. जमशेद मिस्त्री यांनी युक्तिवाद केला.