कोरोना… माणूस… माणुसकी….

0
284
  •  पौर्णिमा केरकर

एक महिनाभर सुनीलचे कुटुंबीय प्रचंड दडपणाखाली वावरत होते. ते दडपण कोरोनाचे नव्हते तर समाजमनाच्या मानसिकतेचे होते! विज्ञान शिकलेली, आरोग्यसेवेत असलेली माणसेही कशी अडाण्यासारखी वागतात याचाच त्याला राहून राहून वैताग येत होता.

माझ्या चुलत भावाला ‘कोरोना’ची लक्षणे आढळली, त्यामुळे आमच्यावरही चौदा दिवसांचा ‘होम कोरन्टाईन’चा शिक्का मारला गेला. सगळी खूप तणावाखाली आहेत. काय करावे ते सुचतच नाही, सकाळी सकाळीच सुनीलने फोन करून ही माहिती पुरवली. ही गोष्ट त्यावेळची, ज्यावेळी ‘कोरोना’ने गावाच्या वेशीला तसा अजून मोठ्या प्रमाणात स्पर्श केला नव्हता. सुनीलचा घाबराघुबरा आवाज फोनवरून मला स्पष्ट जाणवत होता. कोरोना आपल्या अगदी शेजारी येऊन पोहोचला याचे स्पष्ट संकेत दिसत होते. सुनीलच्या कुटुंबीयांना तर या परिस्थितीने पुरते घेरले होते. ते चक्रव्यूहच भेदून बाहेर पडणे खूप कठीण.

एका विचित्र मानसिकतेतून सध्या सर्व जग जात आहे. कधी नव्हे असा हाहाकार सर्वत्र उडालेला दिसतो. निसर्ग कसा माणसाला जमिनीवर आणू शकतो याची प्रचिती विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात वावरणार्‍या, अहोरात्र धाव धाव धावणार्‍या पावलांना या ‘कोरोना’ने आणून दिली आहे. सुनीलच्या भावाचे निदान पॉझिटिव्ह आले म्हणून फक्त खबरदारीसाठी त्याच्या सर्व कुटुंबीयांना चौदा दिवस घरात राहण्याचा आदेश दिला होता. हा हा म्हणता ही बातमी गावात सर्वत्र पोहोचली. सर्वांच्याच भिवया उंचावल्या. कुजबुज्यांत गोष्टी सुरू झाल्या. ध्यानीमनी नसताना हे घडून आले होते. त्यामुळे कसलीच पूर्वतयारी करता आली नव्हती. घरात चौदा दिवस पुरेल एवढे सामान नव्हते. आणण्यासाठी कोणाला सांगायचं तर सर्व शेजार्‍यापाजार्‍यांनी आपल्या घराची दारेच त्यांच्यासाठी बंद करून टाकली. फोनवरून बोलायचं म्हटलं तर ही तोंडावरची मंडळी फोनही टाळू लागली. सुनीलने ठरवलं की आता स्वतः बाजारात गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तो सुजाण, समंजस असल्याने त्याने मनोमन ठरविले होतेच की गर्दीत मिसळायचे नाही, कोणाच्याही संपर्कात न येता वास्तव सांगून सामान आणायचे. तो बाहेर पडला मात्र, शेजार्‍यांना कुठून कसे कळले कुणास ठाऊक! ‘तुला बाहेर जाता येणार नाही, तू बाहेर गेलास तर आमच्या गावात कोरोना पसरवशील.’ ‘पण मला सामान आणण्यासाठी जावंच लागणार दुकानांवर,’ सुनील ठासून बोलला. तुला जाता येणार नाही, कालच आम्ही मंदिरात गावची बैठक बोलाविली, त्यात पुढील चौदा दिवस तुम्हाला घरातून अजिबात बाहेर पडता येणार नाही, आणि जर का गावाचा आदेश तुम्ही पाळला नाही तर गाव तुमच्या घराला आजन्म वाळीत टाकणार, असे सर्वानुमते ठरले. त्यामुळे तुम्ही ठरवायचे की तुम्हाला गावात राहून गावाशी वैर साधायचे, की निमूट उरलेले दिवस तांदूळ उकडून खाऊन जगायचे? परिस्थिती बिकट होती. एकटा सुनील. गावाच्या विरोधात जाण्याचे धाडस त्यावेळी तरी त्याच्याकडे नव्हते. परिस्थितीशरण धोरण स्वीकारण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. शिकूनसवरून, विज्ञान युगात वावरून… स्वतःला आधुनिक सुशिक्षित म्हणवून घेणारी ही माणसे अशा प्रसंगी कशी जीवघेणी वागतात? या विचारानेच त्याला संताप आला. डोकं भणभणत होतं. त्याच्या कुटुंबीयांचा रिपोर्ट येणं अजून बाकी होतं. रिपोर्ट कसाही आला तरी त्याला चालला असता. त्याने तशी मनाची तयारी ठेवली होतीच. शिवाय शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगा, प्राणायाम, काढा करून पिणे असे विविध उपाय चालूच होते. मात्र आजपर्यंत ज्यांनी शेजारधर्म पाळला होता ती माणसे अशी कशी एका क्षणात फिरली? याचाच विचार करकरून त्याचे डोके दुखत होते. दोन दिवसांनी सुनीलला मोबाईलवर त्यांचे सर्वांचेच रिपोर्ट नकारात्मक आले असल्याचा संदेश दिसला. तरीही तो गप्पच राहिला. जोपर्यंत निगेटिव्ह रिपोर्टची प्रत त्याच्या हातात पडत नाही तोपर्यंत त्याचा विश्वास बसणार नव्हता. शेवटी एकदाचा रिपोर्ट आला.

त्याने सुटकेचा निश्वास टाकला. महिनाभर घरात बसून राहिली सर्व कुटुंबीय मंडळी. शेजारी बोलायलाही तयार नव्हते. एवढेच कशाला, त्याचे नातेवाईक ज्या गावात होते, तिथेही त्यांना विचित्र नजरेने पाहिले जायचे. एक महिनाभर सुनीलचे कुटुंबीय प्रचंड दडपणाखाली वावरत होते. ते दडपण कोरोनाचे नव्हते तर दडपण होते समाजमनाच्या मानसिकतेचे! विज्ञान शिकलेली, आरोग्यसेवेत असलेली माणसेही कशी अडाण्यासारखी वागतात याचाच त्याला राहून राहून वैताग येत होता. यानिमित्ताने माणसांचे स्वभाव तरी कळले. तेही पुरेसे आहे. मोठी महामारी येवो की जगबुडी, आम्ही आमच्या चौकटीतील मानसिकतेच्या मर्यादा तोडून वैश्विक होणारच नाही, असेच जणू काही माणसांना सुचवायचे आहे. सुनीलच्या कुटुंबीयांसारखी कितीतरी कुटुंबे या महामारीच्या निमित्ताने सामूहिक छळाची बळी ठरलेली आहेत. सुनील यातून तरून गेला, याला कारण म्हणजे त्याच्याकडे असलेले समाजभान. सजग, संवेदनशील वृत्ती. अडीअडचणीच्या प्रसंगी इतरांना सोबत करण्याचा स्वभाव! परंतु या काळात शेजारी तेही विसरून गेलेत याचेच त्याला राहून राहून वाईट वाटत होते. त्याने काळजी घेतली. ती सुरक्षित आहेत. मात्र आजची परिस्थिती अशी आहे की गावात बर्‍याच ठिकाणी कोरोनाने
प्रवेश मिळविला. गाव आता कोणाकोणाची घरे वाळीत टाकणार?
शेकडो वर्षांनी अशी आपत्ती जगावर आली. प्रसारमाध्यमांतून प्रत्येकाने स्वतःची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिली जात आहे. तरीही सरकारच्या नावाने ओरड सुरूच आहे. सरकारच्याही चुकल्या असतील काही गोष्टी, परंतु नागरिकांची काहीच जबाबदारी नाही का? की तोंड आहे म्हणून नुसते बोलत सुटायचे? त्याला काही निर्बंध हवेत की नकोत? आजच्या घडीला गरज आहे ती लोकांना मानसिक आधार देण्याची. न भूतो, न भविष्यती अशी उलथापालथ सध्या झालेली आहे. समाजसेवी संस्था, आरोग्य सेवेकरी, पंचायतींच्या माध्यमातून अशी जागृती गावागावांतून व्हायला हवी. गावांना सजग करून त्यांना योग्य माहिती पुरविणे, लक्षणे दिसली तर ती लपवून न ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, तोंडाला मास्क, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून वागणे अशा काही गोष्टींचे काटेकोर पालन केले तर या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. त्यासाठी लोकांची मानसिकता तयार करणे ही मोठी जोखीम आहे. जबाबदार घटकांनी यावर विचार करून कृती करायला हवी. एखाद्याला लागण झाली की लगेच त्याला शिव्या, कुटुंबाला अपमानास्पद वागणूक…
यातूनच आजारपण लपविण्याचे गुन्हे घडतात. मला लागण झाली, इतरांना होऊ दे, हीही मानसिकता बळावण्याची शक्यता, किंबहुना बळावत आहेच! ही महामारी अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणारी ठरली. असे असतानाही जगण्याची इच्छाशक्ती जबरदस्त आहे.