कोरोना आजाराविषयी जाणून घ्या सर्व काही

0
770
कोरोना विषाणूच्या आजाराने सध्या जगभरामध्ये दहशत व घबराट निर्माण केली आहे. या आजारावर लस निर्माण करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरू असल्या, तरी औषध उपलब्ध नाही. त्याचा संसर्गही झपाट्याने होऊ शकत असल्याने ही भीती आहे. परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य ती खबरदारी घेऊन आपण या कोरोनाच्या धोक्यापासून बचाव करू शकतो. नवप्रभेच्या वाचकांसाठी कोरोनाविषयीची ही सर्वंकष माहिती-
कोरोना विषाणू म्हणजे नेमके काय?
कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहित आहेत. २००३ मध्ये आढळलेला ‘सार्स’ हा आजार किंवा २०१२ मध्ये आढळलेला ‘मर्स’ हा आजार हे सुद्धा करोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत, परंतु डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला ‘नॉवेल’ अर्थात नवीन कोरोना विषाणू असे संबोधण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास ‘कोविड-१९’ असे नाव दिलेले आहे.
 कोरोनाचे मूळ स्थान कोणते?
कोरोना हा प्राणीजगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळामध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणीजगतातील सूक्ष्मजीव मानवामध्ये प्रवेश करतात.
 कोरोना विषाणू आजाराची लक्षणे कोणती?
कोरोना विषाणूशी संबंधित आजाराची लक्षणे ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडीत असतात. ती सर्वसाधारणपणे इन्फ्ल्युएन्झा आजारासारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्युमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.
 कोरोना विषाणूमुळे होणारा आजार पसरतो कसा?
हा आजार शिंकण्या – खोकण्यातून जे थेंब बाहेर पडतात, त्यातून पसरतो. याशिवाय शिंकण्या – खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात. अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे विषाणू हाताला चिकटतात. हाताने वारंवार डोळे, नाक चोळण्याच्या वा चेहर्‍याला स्पर्श करण्याच्या सवयीमुळेही हा आजार पसरू शकतो.
 कोरोनावर औषध उपलब्ध आहे का?
कोरोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णावर त्याच्या लक्षणांनुसार उपचार केले जातात. काही विशिष्ट औषधोपचारांच्या चाचण्या जगभरात चालू आहेत. जागतिक आरोग्य संघटना या विषाणूच्या प्रतिबंधासाठी लस आणि औषधे विकसित करण्यासाठी क्लिनिकल चाचण्यांद्वारे आंतरराष्ट्रीय सहकार्यातून प्रयत्न करीत आहे.
 कोणी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा?
– ताप, खोकला असलेल्या व श्वसनास त्रास होणार्‍या व्यक्ती.
– हा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्यास व रुग्णाने कोरोनाबाधित देशात प्रवास केलेला असल्यास.
– प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवास केलेला आहे.
 कोरोना विषाणू आजाराची लक्षणे कोणती?
या आजाराची सामान्य लक्षणे म्हणजे ताप, सर्दी व कोरडा खोकला. काही रुग्णांना श्वसनास त्रास होणे, अंगदुखी, घसा खवखवणे किंवा अतिसार असू शकतो. ही लक्षणे सहसा सौम्य असतात आणि हळूहळू ती वाढायला सुरूवात होते. बहुतेक लोकांमध्ये (सुमारे ऐंशी टक्के) हा आजार सौम्य स्वरूपाचा असतो तसेच विशेष उपचार न घेताच स्वतःच्या प्रतिकारशक्तीने या आजारापासून ते बरे होतात. आजारी व्यक्तीपासून संसर्ग होऊ नये यासाठी किमान एक मीटर लांब राहणे महत्त्वाचे असते.
 एखाद्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नसतानाही आजाराचा प्रसार होऊ शकतो का?
हा आजार पसरण्याचा मुख्य मार्ग म्हणजे श्वासोच्छ्‌वास. ज्या व्यक्तीला हा आजार आहे, त्याच्या खोकल्यातून, शिंकण्यातून बाहेर पडणार्‍या थेंबांतून तो पसरत असल्याने मुळीच लक्षणे नसलेल्या व्यक्तीकडून हा आजार पसरण्याचा धोका खूप कमी आहे.
 या आजाराची लक्षणे किती दिवसांनी दिसतात?
कोरोना विषाणूचा शरीरात संसर्ग झाल्यापासून आजाराची लक्षणे दिसेपर्यंतचा कालावधी आजवरच्या अभ्यासातून १ ते १४ दिवसांचा असल्याचे दिसून आले आहे. सर्वसाधारपणे तो ५ दिवसांचा आहे.
 या आजाराचे गांभीर्य कधी वाढते?
वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, ह्रदयरोग किंवा मधुमेह यासारखे दीर्घ मुदतीचे आजार असणार्‍यांना या आजारातून गुंतागुंत होण्याची शक्यता असते. ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण असलेल्या लोकांनी तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत. विशेषतः मुले व तरुण प्रौढांसाठी हा आजार सामान्यतः सौम्य असतो. तथापि, प्रतिकारशक्ती कमी झालेल्या वृद्ध व्यक्ती आणि उच्च रक्तदाब, ह्रदयरोग किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये तो गंभीर रूप धारण करू शकतो.
 मुखवटा (फेस मास्क) घालणे कितपत फायदेशीर?
जर आपल्याला आजाराची लक्षणे असतील किंवा संसर्ग झालेल्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात असाल तर मुखवटा (फेस मास्क) घालणे आवश्यक आहे. डिस्पोजेबल फेस मास्क फक्त एकदाच वापरला जाऊ शकतो. अन्यथा त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे न लावल्यास इतरांना धोका निर्माण होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना जनतेला मास्कचा अनावश्यक वापर करू नये असा सल्ला देत असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी हातरुमालाचे तीन पदर करून चेहरा झाकावा, जो रोज योग्य प्रकारे धुतला जाऊ शकतो.
 एखाद्या प्राण्याच्या माध्यमातून तो संक्रमित होईल?
कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे, जे प्राण्यांमध्ये सामान्यतः आढळून येतात. कधी कधी लोकांना प्राण्यांचा वा त्यांच्या मांसाचा निकटचा संपर्क आल्यामुळे या विषाणूची लागण होऊ शकते. सार्स हा आजार मांजरीशी संबंधित होता व मर्स हा आजार उंटांद्वारे प्रसारित झाल्याचे अनुमान आहे. प्राणी अथवा त्यांच्या मांसाशी थेट संपर्क टाळणे हितकारक आहे. कच्चे मांस, दूध किंवा जनावरांच्या अवयवांना काळजीपूर्वक हाताळा. कच्च्या व अर्धवट शिजलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करणे टाळा.
 वस्तूवर किंवा पृष्ठभागावर कोरोना विषाणू
     किती दिवस टिकून राहू शकतो?
या आजाराला कारणीभूत विषाणू  पृष्ठभागावर किती दिवस टिकतो हे निश्‍चित नाही. अभ्यासानुसार कोरोना विषाणू काही तास किंवा कित्येक दिवस पृष्ठभागावर टिकून राहू शकतात. हे परिस्थितीनुसार भिन्न असू शकते. (उदा. पृष्ठभागाचा प्रकार, वातावरणाचे तापमान आणि आर्द्रता) जर आपल्याला एखादा पृष्ठभाग संक्रमित झाला आहे असे वाटत असेल तर विषाणू नष्ट करण्यासाठी साध्या जंतुनाशकाने तो पृष्ठभाग स्वच्छ करावा. आपले हात साबण आणि पाणी वापरून स्वच्छ धुवा. धुण्यापूर्वी डोळे, नाक किंवा तोंड यांस स्पर्श करणे टाळा.
 आपण काय खबरदारी घ्यावी?
– आरोग्याच्या चांगल्या सवयी अवलंबाव्यात
– गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावे.
– नियमितपणे साबण व पाणी वापरून हात स्वच्छ धुवावेत.
– खोकणार्‍या किंवा शिंकणार्‍या व्यक्तीपासून कमीत कमी एक मीटर अंतर ठेवावे. तुम्ही तिच्या खूप जवळ असाल तर तुमच्या शरीरात ते विषाणू संक्रमित होऊ शकतात.
– हात स्वच्छ धुण्यापूर्वी डोळे, नाक किंवा तोंड यांस स्पर्श करणे टाळावे, त्यातून विषाणू आपल्या शरीरात शिरू शकतात.
– आपण खोकतो किंवा शिंकतो तेव्हा आपले तोंड व नाक रुमालाने, हाताने किंवा टिश्यू पेपरने झाकावे. मग वापरलेल्या टिश्यू पेपरची बंद कचराकुंडीत त्वरित विल्हेवाट लावावी व हात साबण लावून स्वच्छ धुवावेत.
– आपल्याला ताप, खोकला, सर्दी असेल तर डॉक्टरकडे जा.
– सार्वजनिक ठिकाणी, उघड्यावर थुंकू नये.
– अफवांवर विश्वास ठेवू नये.
– घाबरू नका, पण जागरूक राहा. काळजी घ्या!