‘कॅफे कॉफी डे’च्या सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला नेत्रावती नदीत

0
112

कॅफे कॉफी डे कंपनीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मंगळुरू येथील नेत्रावती नदीत बुडून मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी उशिरा सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी शासकीय पातळीवरून मोठी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र काल सकाळी ६.३० वा. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीत तरंगताना तेथील मच्छीमारांना आढळून आला अशी माहिती मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशिकांत सेंथिल यांनी पत्रकारांना दिली.
सिद्धार्थ यांच्यावर काल संध्याकाळी चिकमंगळूर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

कंपनी संचालकांना
लिहिले होते पत्र
तटरक्षक दल, एनडीआरएफ, किनारी पोलीस व स्थानिक नागरिक यांनी सुमारे ३६ तास सिद्धार्थ यांच्या शोधासाठी परिश्रम घेतले. अखेर त्यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ यांनी हे टोकाचे पाऊल व्यावसायिक अपयशाच्या दबावाखाली येऊन उचलले आहे. त्यांनी आपल्या कंपनीच्या संचालक मंडळाला अलीकडेच एक पत्र लिहिल्याचे उघडकीस आले असून त्यात त्यांनी व्यवसायात आपण अपयशी ठरल्याची भावना व्यक्त केली. ३७ वर्षांच्या मोठ्या मेहनतीनंतर आपण आपल्या कंपनीत ३० हजार लोकांना रोजगार दिला. एक चांगला ब्रँड निर्माण केला. मात्र हा उद्योग यशस्वी करण्यात आपल्याला अपयश आले. अथक प्रयत्न करुनही त्या अपयशापासून आपण सावरू शकलो नाही. याचा आपल्यावर प्रचंड दबाव आला. सहा महिन्यांपूर्वी एका मित्राकडून मी मोठे कर्ज घेतले होते. त्याचाही दबाव आपण सहन करू शकलो नाही असे सिद्धार्थ यांनी पत्रात म्हटले आहे. आयकर खात्याच्या अधिकार्‍यांकडून आपली छळणूक झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, सिद्धार्थ यांच्या संदर्भातील ताज्या माहितीवरून त्यांचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचे दिसून येते. मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत अन्य कोणतीही बाब नाकारता येत नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई असलेले ६९ वर्षीय सिद्धार्थ कॅफे कॉफी डे या त्यांच्या ब्रँडमुळे कॉफी किंग म्हणून संबोधले जात होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी मालविका व दोन पुत्र असा त्यांचा परिवार आहे. देशभरात त्यांच्या कंपनीच्या आस्थापनाचे जाळे पसरले आहे.
सिद्धार्थ यांची शवचिकित्सा मंगळुरू येथील वेनलॉक हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी चिकमंगळुर येथे नेण्यात आले.

सिद्दरामैय्या यांची प्रतिक्रिया
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्दरामैय्या यांनी सिद्धार्थ यांच्या मृत्यूवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की ही घटना अतिशय अस्वस्थ करणारी व गूढ अशा प्रकारची आहे.