‘किंग्स कप’मध्ये खेळणार भारत

0
101

थायलंडमध्ये जूनमध्ये होणार्‍या निमंत्रितांच्या ‘किंग्स कप’ स्पर्धेत भारताचा फुटबॉल संघ सहभाग नोंदविणार आहे. ३६,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या बुरिराम येथील चांग एरिनावर स्पर्धेतील सर्व सामने खेळविले जाणार आहेत. भारताव्यतिरिक्त यजमान थायलंड, व्हिएतनाम व कुराकाओ हे देश या स्पर्धेत खेळणार आहेत. एप्रिल महिन्यातील फिफा क्रमवारीनुसार भारत १०१व्या, थायलंड ११४व्या, व्हिएतनाम ९८व्या तर कुराकाओ ८२व्या स्थानी आहे. ५ जून रोजी दोन सामने होणार असून यातील विजेते संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील तर पराभूत दोन संघ तिसर्‍या स्थानासाठीचा सामना खेळणार आहेत. या स्पर्धेद्वारे भारताला तब्बल १८ वर्षांनी फिफा रँकिंग स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी २००१ साली क्वालालंपूर येथे मेर्डेका या फिफा रँकिंग स्पर्धेत भारत खेळला होता. ‘किंग्स कप’ स्पर्धेला फिफाचा ‘अ’ दर्जा प्राप्त असून फुटबॉल असोसिएशन ऑफ थायलंड १९६८पासून या स्पर्धेचे आयोजन करत आहे. १९७७ साली अखेरच्या वेळी भारत या स्पर्धेत खेळला होता.