काकोडा-कुडचडे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी कर्ज घेण्यास मान्यता

0
169

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या बैठकीत काकोडा – कुडचडे येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नार्बाडकडून १८९ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास काल मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो व इतरांची उपस्थिती होती.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. साळगाव येथील प्रकल्पाचा दर्जा वाढविण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. तसेच काकोडा येथील नवीन प्रकल्पाचे काम हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.

सोनसडा समस्येवर आज बैठक
सोनसडो येथील कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत मडगाव नगरपालिका आणि फोमेंतो कंपनी यांच्यातील वादावर तोडगा काढण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री लोबो यांनी दिली. सोनसडा येथील कचर्‍याच्या प्रश्‍नावर तोडगा काढल्यानंतर गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून साचलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाच्या सूचनेनंतर काकोडा प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार आहे. नुवे येथे १ टन क्षमतेचा नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जाणार आहे. बायंगिणी येथील कचरा प्रकल्पासाठी पर्यावरण दाखल्याच्या प्रतीक्षेत आहोत. या कचरा प्रकल्पाची निविदा तयार ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बायंगिणी प्रकल्पासाठी नाबार्डकडून कर्ज घेतले जाणार आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री लोबो यांनी दिली.