ऑस्ट्रेलियाला नमवून भारत अंतिम फेरीत

0
97

>> सुलतान ऑफ जोहोर कप

भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाने काल बुधवारी ऑस्ट्रेलियाचा ५-१ असा पराभव करत सुलतान ऑफ जोहोर कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मलेशियात सुरू असलेल्या या स्पर्धेतील कालच्या लढतीत भारतीय संघातर्फे शिलानंद लाक्रा (२६वे व २९वे मिनिट), दिलप्रीत सिंग (४४वे मिनिट), गुरसाहिबजीत सिंग (४८वे मिनिट) व मनदीप मोर (५०वे मिनिट) यांनी गोलजाळीचा वेध घेतला.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या चुकीमुळे भारताला पहिली संधी लाभली होती. हवेतून उडविलेल्या चेंडूचा व्यवस्थित अंदाज न आल्याने या चेंडूवर भारताच्या गुरसाहिबजीत याने ताबा मिळविला. वर्तुळात प्रवेश करून गोल नोंदविण्याच्या तयारीत असतानाच रॉबर्ट मॅकलेन्नन याने गोल नोंदविण्याचा कोन शिताफीने बंद करताना चेंडू व्यवस्थितरित्या दुसर्‍या बाजूने ढकलला. पहिल्या सत्रातील आठव्या मिनिटाला कांगारूंच्या संघाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर वगळता उर्वरित वेळ मध्यमैदानातच चेंडू खेळता ठेवण्यात उभय संघांनी धन्यता मानली. दुसर्‍या सत्रात प्रशांत चौहानच्या बचावाची कसोटी लागली. मायकल फ्रान्सिस याचा फटका सॅम मॅककुलोच याच्या स्टिकला लागून गोलजाळीत विसावण्याच्या तयारीत असतानाच चौहान याने सुरेख गोलरक्षण करत कांगारूंना आघाडीची संधी नाकारली.

लाक्राने भारताला आघाडीवर नेणारा गोल केला. परंतु, या गोलचे बहुतांशी श्रेय दिलप्रीत सिंगच्या वर्तुळातील अचूक पासला द्यावे लागेल. कांगारूंच्या बचावफळीला भेदून दिलेल्या या पासवर लाक्राने पुढे सरसावणार्‍या मॅकलेन्ननला हुलकावणी देत गोल केला. हे सत्र संपण्याला अवघी काही मिनिटे असताना चौहान याने कांगारूंचा अजून एक हल्ला परतवून लावला. भारताने प्रतिहल्ला करत गोल देखील केला. पुन्हा दिलप्रीत-लाक्रा जोडी कांगारूंना भारी ठरली. मध्यंतरापर्यंत भारतीय संघ २-० असा आघाडीवर होता. दोन गोलांची आघाडी असूनही भारताने सावध खेळ न दाखवता आक्रमकता कायम राखली. तिसर्‍या सत्रात भारताने दोन गोल लगावले. शिलानंद लाक्रा, सुदीप चिरमाको व उत्तम सिंग यांना कांगारूंवरील दबाव हटणार नाही याची पुरेपूर लक्षता घेतली. शुक्रवारी शेवटच्या राऊंड रॉबिन लढतीत भारताचा सामना ब्रिटनशी होणार आहे. १९ रोजी याच संघांत अंतिम लढत खेळविली जाणार आहे.