एटीकेकडून हैदराबाद एफसीचा धुव्वा

0
95

ऍटलेटिको दी कोलकाताने काल विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या इंडियन सुपर लीग स्पर्धेत हैदराबाद एफसीचा ५-० असा धुव्वा उडवित आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.

घरच्या मैदानावरील हा विजय यशस्वी मार्गदर्शक अँटोनिओ लोपेझ हबास यांच्यासाठीही महत्त्वाचा ठरला. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड विल्यम्स व स्पेनच्या एदू गार्सिया यांनी प्रत्येकी दोन, तर भारताच्या रॉय कृष्णाने एक गोल केला.
पूर्वार्धात दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल केल्यावर एटीकेने हैदराबादला स्थिरावू दिले नाही. हैदराबादचा संघ गत मोसमात एफसी पुणे सिटी नावाने सहभागी झाला होता. त्यांच्यासाठी आयएसएलमधील पदार्पण निराशाजनक ठरले. एटीकेला सलामीस कोचीमध्ये केरला ब्लास्टर्स एफसीविरुद्ध निराशाजनक हार पत्करावी लागली होती. यावेळी मध्यंतरास तीन गोलांची भक्कम आघाडी घेत एटीकेने आपली क्षमता दाखवून दिली.

बदली खेळाडू गार्सियाने दोन मिनिटे बाकी असताना आणि मग भरपाई वेळेत गोल केले. दोन्ही वेळा प्रबीर दासने त्याच्यासाठी पायाभरणी केली. हैदाबादला खेळाडूंच्या दुखापती आणि बदली खेळाडूंचा कोटा पूर्ण झाल्यामुळे ७७व्या मिनिटानंतर दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले.

सरस खेळाचे फळ एटीकेला २५व्या मिनिटाला मिळाले. झेव्हियर हर्नांडेझेने मध्य क्षेत्रातून दिलेल्या अप्रतिम पासवर विल्यम्सने तसाच सुंदर फटका मारला. त्यावेळी हैदराबादचा गोलरक्षक कमलजीत सिंग पुढे सरसावला होता, पण विल्यम्सने त्याला चकविले. हैदराबादच्या खेळाडूंनी ऑफसाईडचे अपील केले, पण पंच उमेश बोरा यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

दोन मिनिटांत एटीकेचा दुसरा गोल झाला. डावीकडून विल्यम्स ड्रिबलिंग करीत घोडदौड केली. रॉय सुद्धा लयबद्ध पद्धतीने धावत येतो आहे हे हेरताच त्याने त्याला पास दिला. रॉयने मारलेला चेंडू नेटच्या उजव्या पोस्टला लागून आत गेला.
मध्यंतरास एक मिनिट बाकी असताना हैदराबादला बचावातील ढिलाईचा पुन्हा फटका बसला. आघाडी फळीतील सहकारी जयेश राणेने रचलेल्या अप्रतिम चालीवर विल्यम्सने ऑफसाईडचा सापळा चुकवित लक्ष्य साधले.

घरच्या मैदानावर एटीकेची सुरवात चांगली झाली. पहिल्याच मिनिटाला पेनल्टी क्षेत्रात मार्किंग नसल्याचे हेरत राणे लांबून फटका मारला, पण तो स्वैर होता. दुसर्‍या मिनिटाला एटीकेचा बचावपटू प्रबीर दासने उजवीकडून आगेकूच केली असताना साहील पन्वरही त्याला रोखण्यासाठी धावत होता. प्रबीर फटका मारत असताना त्याने रखले. प्रबीरसह एटीकेच्या खेळाडूंनी पेनल्टीचे अपील केले, पण ते फेटाळले गेले.
सहाव्या मिनिटाला हैदराबादला डावीकडे फ्री किक मिळाली. मार्सेलिनीयोने फटकाही छान मारला, पण एटीकेच्या आगुस्टीन इनीग्युएझने बचावाची जबाबदारी चोख पार पाडली.

चार मिनिटांनी आशिष रायने हैदराबादचा गोलरक्षक कलमजीत सिंगच्या दिशेने चेंडू मारला. कमलजीतने चेंडू मारण्यास विलंब लावला. त्यामुळे विल्यम्सने मैदानावर घसरत प्रयत्न केला, पण हैदराबादच्या सुदैवाने कलमजीत वेळीच सावरला. विल्यम्सने ११व्या मिनिटाला केलेला प्रयत्न कमलजीतने डावीकडे झेपावत थोपविला.
एटीकेने नंतर अनेक प्रयत्न केले. परंतु ते वाया गेले. आघाडी फळीतील मायकेल सुसैराजच्या फटक्यावर कमलजीत चकला होता, पण चेंडू गोलपोस्टला लागला.