ऍशेस मालिका आजपासून

0
153

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून ऍशेस कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याद्वारे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेलादेखील प्रारंभ होणार आहे. यजमान इंग्लंडने कसोटीच्या पूर्वसंध्येलाच आपला अंतिम ११ जणांचा संघ जाहीर केला असून वर्ल्डकप गाजवणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. संघाचा योग्य समतोल राखण्यासाठी ख्रिस वोक्सला पसंती देण्यात आली आहे. दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या कसोटीला मुकलेल्या जेम्स अँडरसन याचे संघात पुनरागमन झाले आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत जोफ्रा आर्चरचा अंतिम क्षणी समावेश करण्यात आला होता. आर्चरने ११ लढतीत २० बळी घेत आपली निवड सार्थ ठरवली होती. विश्‍वचषकात सर्वाधिक बळी घेणार्‍यांच्या यादीत तो स्टार्क आणि लॉकी फर्ग्युसननंतर तिसर्‍या स्थानावर होता. त्याच्या या कामगिरीमुळे ऍशेस कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. पहिल्या कसोटीसाठीच्या १४ खेळाडूच्या यादीतही त्याचे नाव होते. परंतु अंतिम ११ मध्ये मात्र त्याला स्थान मिळाले नाही. मोईन अलीच्या रुपात एकमेव फिरकीपटू इंग्लंड संघात आहे. मालिकेचे दीर्घ स्वरुप लक्षात घेता पहिल्याच कसोटीत प्रयोग करण्याचे इंग्लंडने टाळले आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने आपला प्रमुख डावखुरा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क याला बाहेर बसविण्याचा निर्णय घेताना जेम्स पॅटिन्सनला संधी देण्याचे निश्‍चित केले आहे. असे झाल्यास २०१३ सालानंतर प्रथमच पॅटिन्सन ऍशेस मालिकेत खेळताना दिसेल. पॅट कमिन्सची जागा पक्की असून तिसर्‍या वेगवान गोलंदाजाच्या जागेसाठी पीटर सिडल व जोश हेझलवूड यांच्यात चुरस आहे. यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून संघात खेळणार आहे. अतिरिक्त मध्यमगती गोलंदाजाचा पर्याय ऑस्ट्रेलियाने निवडल्यास ट्रेव्हिस हेडच्या जागी मिचेल मार्शला संधी मिळू शकते.

इंग्लंड ः रॉरी बर्न्स, जेसन रॉय, ज्यो रूट, ज्यो डेन्ली, बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बॅअरस्टोव, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसन.
ऑस्ट्रेलिया (संभाव्य) ः डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून बॅन्क्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टिम पेन, पॅट कमिन्स, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लायन व जोश हेझलवूड.