उच्च सुरक्षा क्रमांक पट्ट्यांसाठी अन्य वितरकांची मदत घेणार

0
123

वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक पट्ट्या (हाय सेक्युरिटी नंबर प्लेट्‌स) बसवण्यासाठी राज्यभरातील नंबर प्लेट्‌स वितरकांची मदत घेण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे, अशी माहिती काल वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यानी दिली. मात्र, त्यासाठी वाहन मालकांना अतिरिक्त शंभर रुपये शुल्क भरावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
वाहतूक खाते आपल्या आरटीओ कार्यालयांतर्फे एचएसआरपी क्रमांक पट्ट्या बसवण्यासाठी ३०० रुपये एवढे शुल्क आकारत असते. मात्र, वाहतूक खात्याची ही प्रक्रिया एकूणच किचकट व वेळकाढू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपण खात्याच्या सचिवांशी बोलणी केलेली असून संचालकाना यासंबंधीची फाईल आपणाकडे पाठवण्यास सांगितले आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

वरील संबंधी आपण लोकांना पर्याय देणार असून ज्यानी विनाविलंब आपल्या वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी बसवून हवी आहे व ज्यांची त्यासाठी अतिरिक्त शंभर रुपये भरण्याची तयारी आहे त्यांना राज्यभरातील नंबर प्लेट्‌स वितरकांपैकी कुणाकडूनही तो बसवून घेण्याचा पर्याय देण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले. मात्र, ज्यांना घाई नाही अशा वाहन चालकांना ३०० रुपये भरून आरटीओकडून नंबर प्लेट बसवू घेता येईल.

क्रमांक पट्ट्या बसवण्यासाठीचे कंत्राट ज्या एजन्सीला मिळाले आहे त्यांना क्रमांक पट्ट्यांच्या वितरकांशी हातमिळवणी करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
आरटीओकडे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांना सर्व वाहनांवर अशा क्रमांकपट्ट्या बसवून देणे शक्य होणार नसल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.