उंच माझा झोका

0
355
  • अक्षता छत्रे

कलाकारांचे परिश्रम, त्यांची वेशभूषा, रंगभूषा अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा अधिक सखोलपणे केला गेलेला अभ्यास, तसेच विक्रम गायकवाड व स्पृहा जोशी यांच्या परिश्रमातून सुरेख साकारलेली रमा अन् महादेवराव रानडे यांच्या जोडीमुळेच हा ‘झोका’ खर्‍या अर्थाने उंच आकाशात झेप घेऊ शकला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

झी-मराठी ही वाहिनी न चुकता दर्जेदार कार्यक्रमांनी आपले मन रमवीत असते. नाही! पूर्णपणे तृप्तच करते. साधारणपणे २०१३ साली रात्री आठ वाजता कानी एक गाणे यायचे, ‘त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका’. व्वा! ती शब्दांची जुळवाजुळव आणि मधुर स्वरांची साथ. माझे वय तेव्हा बारा वर्षे आणि त्यावेळी ती मालिका नेमके काय सांगत आहे हे जरा कमीच उमजायचे. हं! पण इवलीशी यमुना लहान वयातच रमाबाई रानडे झाली हे पुरे उमगले होते मला.

गायिका मधुर आवाजात म्हणायची, ‘माप मी ओलांडले अन् दूर गेली भातुकली’. खरोखरच बाकी सर्व गोष्टी बाजूला सारता बालविवाह आणि जुन्या रूढी-परंपरा स्त्री जातीला कशा जखडून टाकत याची समज मला येत होती. घरातील वडील बायकांचे बोल आणि स्वतःनं (महादेव रावांनी)घालून दिलेली शिक्षणाची ओढ ह्यात तारांबळ उडालेली माझ्या वयाची छोटीशी रमा मला दिसत होती.
आता लॉकडाऊनच्या दिवसांत, मी नव्याने घेतलेला ध्यास म्हणजे उंच माझा झोका. आज सहा वर्षांनंतर मालिका आणि पात्रे तर तीच आहेत पण अठरा वर्षांच्या मला त्यातून शिकण्यास नवीन खूप काही मिळाले. ‘हातात पुस्तके घेतली तर देव पाप करतो’, हे रमेचे वाक्य त्या काळातील अंधश्रद्धेचे दर्शन घडवून गेले. बायकांना दिले गेलेले स्थान म्हणजे फक्त ‘चूल आणि मूल’. काय विकृत समाज त्या काळचा. आपणाहून वयाने वीस वर्षे मोठा नवरा असणे म्हणजे काय परिस्थिती असेल त्या लहानग्या मुलीची हा विचार करून डोळ्यात पाणी तरळून आले.

विदुर पुरुषाने कितीही लग्ने केली तरीही ती समाजमान्य असत आणि पतिनिधनानंतर विधवा स्त्रीने मात्र केशवपन करून तांबडे वस्त्र परिधान करावे आणि ते तिच्या नशिबी कायमचेच! इथेच न थांबता आंबट, तिखट, गोडाचे पदार्थ ही त्यांस वर्ज्य केले जात, हसत खेळत आनंदात नं मिसळणे, आनंदाच्या कार्यक्रमांमधून त्यांस बाजूला सारणे हे सर्व जणू त्यांच्या आयुष्यात उठलेली एक कायमचीच न पुसणारी रेष मानली जात होती. कारण काय तर त्या स्त्रीने कुरूप दिसावे आणि शरीराने क्षीण बनलेल्या तिच्या शरीराला कोणतेही नवे आकर्षण वाटू नये. वयाने फार मोठ्या असलेल्या पतीच्या निधनानंतर बालविवाहीत विधवांचे आयुष्य अशाप्रकारे आपल्या जुन्या विचारांनी आपण जखडून टाकले होते. काय मानव स्वभाव म्हणावा याला? पत्नीला पतीची अर्धांगिनी म्हणून संबोधणे आणि त्याच अर्ध्या अंगाला शारीरिक आणि मानसिक त्रासातून सतत कष्टी बनवत राहणे हाच काय तो आपला जुना समाज. पत्नीचे काम म्हणजे पतीचा प्रपंच सांभाळून त्याच्या सर्व गरजा पूर्ण करणे. कदाचित, हेच स्त्रियांनी मुकाटपणे आपले कर्तव्य मानलेले असेल, रडल्या असतील आणि तोंड दाबून गप्पही झाल्या असतील. सनातनी विचारांमध्ये बायकांनाच एवढे कष्टी जीवन का मिळाले हे मात्र मला अजून कळले नाही.

सुरुवातीच्या गाण्याचा अर्थ आता समजतोय आणि सुरांपेक्षा त्या अर्थाच्या मी जास्तच प्रेमात आहे. ‘जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट…’. बाकी स्त्रियांच्या माथी ह्याच मळवटाने जे कष्ट रेखाटले त्याला रमाबाई मात्र अपवाद ठरल्या. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.. फर्स्ट क्लास सब जज्ज’ असा पतीचा परिचय करणारी छोटीशी रमा इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनली ती अर्थातच माधवरावांच्या नवविचारांमुळे आणि जिद्दीमुळे.

ऋतुप्राप्ती झाल्यानंतर वयाने फारच मोठ्या असलेल्या पतीसोबत संसार थाटण्यासाठी तिला धाडले पण काय समज असेल तिची तिच्या पतीबद्दल? पण, तिचे भाग्य थोर म्हणून न्यायमूर्तीसारखे पती तिच्या नशिबी आले आणि शिक्षण हाच त्यांच्या नात्याचा पाया ठरला. प्रथम पत्नीच्या निधनानंतर नवमतवादी माधवरावांचा हा मनाविरुद्ध विवाह जरी असला तरी कालांतराने तो बहरला आणि उमलला. विद्यार्थ्याच्या रूपात आलेली रमा त्यांची सहचारिणी बनली. घरातील सनातनी विचारांना सांभाळत संयमाने त्यांच्या संसाराची गाडी सुरळीतपणे सुरू झाली आणि पुस्तक हातात घेतल्याने देव शिक्षा करतो म्हणणार्‍या रमेने इंग्रजी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि तिने तो जिद्दीने पूर्ण देखील केला. संयमी आणि विचारी माधवरावांनी जे रोप लावले त्याच्या बनलेल्या वृक्षाने अनेक महिलाना साक्षर बनविले, विधवांना आधार मिळाला आणि गाण्यातून जणू ‘जन्मले नव्याने असे…’ रमा का म्हणते हे मलाही समजले.

आगळे-वेगळे असे नाते पाहिले मी त्यांच्यात. एकमेकांना दिलेला सन्मान, आदर, एकमेकांप्रति क्षणोक्षणी बहरणारे प्रेम मला फार म्हणजे फारच आवडले. त्या कठीण काळातील महादेवराव आणि रमाबाई मला वंदनीय वाटतात. त्यांचे विचार आणि त्यांची कृती मला आदरणीय वाटते. त्यांचे अजब नाते मला भुरळ पाडते.
अर्थातच याचे श्रेय निर्मात्यांना म्हणजेच ऋग्वेदी आणि विरेन प्रधान यांना देईन. यात मोलाचा वाटा हा प्रत्येक टीम मेंबरचा आहे. कलाकारांचे परिश्रम, त्यांची वेशभूषा, रंगभूषा, एका पारंपरिक ब्राम्हणाचे घर, त्यांची बोली मराठी भाषा, अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा अधिक सखोलपणे केला गेलेला अभ्यास आणि अर्थातच विक्रम गायकवाड आणि स्पृहा जोशी यांच्या परिश्रमातून अगदी सुरेख साकारलेली रमा आणि महादेवराव रानडे यांच्या जोडीमुळेच हा झोका खर्‍या अर्थाने उंच आकाशात झेप घेऊ शकला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.