आत्माराम नाडकर्णी म्हादईप्रश्‍नी गोव्याच्या कायदा सेवेतून मुक्त

0
102

>> निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

गोवा मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत म्हादई पाणी तंटा प्रकरण तसेच खाणीसंबंधी गोवा सरकारच्यावतीने न्यायालयात बाजू मांडणारे वकील आत्माराम नाडकर्णी यांना सदर सेवेतून मुक्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
फोंडा येथे एक अद्ययावत ग्रंथालय उभारता यावे यासाठी फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व जमीन कला व संस्कृती खात्याकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. फोंड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत पाडून त्या ठिकाणी फोंडा ग्रंथालयासाठी मोठी इमारत बांधण्याचा व त्या इमारतीतील एक मजला फोंडा आरोग्य केंद्राला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्य वीज अभियंता रेश्मा मॅथ्यू या गेल्या मे महिन्यात जेव्हा निवृत्त झाल्या होत्या तेव्हा त्यांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत सेवावाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत संमती देण्यात आल्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.