अशक्यप्राय ध्येय गाठण्यासाठी प्रचंड मेहनत करा : डॉ. माशेलकर

0
119
माशेल येथे शारदा इंग्लिश हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बोलताना डॉ. रघुनाथ माशेलकर. सोबत मिलिंद तिंबले, विनायक सातोस्कर, डॉ. रामचंद्र करंडे व इतर. (छाया : नरसिंह प्रभू)

अशक्य समजल्या गेलेल्या गोष्टी आपण शक्य करू शकतो. मात्र, त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. सकारात्मक दृष्टी, उच्च ध्येय बाळगले पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षण हे भविष्य आहे. आपल्यात असलेली असंतुष्टता धोक्याची असून त्यामुळे अपयश येते. आपल्यात आकलनशक्ती निर्माण करा. मी करू शकतो, यापेक्षा आम्ही आम्ही करू शकतो असा दृष्टीकोन असावयास हवा. यासाठी संघटनेची गरज असून संघटनेच्या आधारे आपण समाजाची प्रगती साधू शकतो असे प्रतिपादन प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी माशेल येथे केले.येथील शारदा मंदिर संचालित शारदा इंग्लिश हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त देवकीकृष्ण सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. माशेलकर बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले, ‘‘मेहनतीला पर्याय नसतो. मेहनतीद्वारे निर्माण होणारे प्रश्‍न, प्रती प्रश्‍नांची अनेक उत्तरे शोधायला हवीत म्हणजे त्यातील एक उत्तर आपणाला योग्य दिशेने जाण्यास प्रवृत्त करते. आणि सदर उत्तर समाजाच्या परिवर्तनास मदतगार ठरते. आज आम्ही स्वीकारलेल्या अनेक पद्धतींमुळे विकास खुंटत आहे. हा विकास योग्य दिशेने नेण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल झाला पाहिजे. गुरुंचा आदर झाला पाहिजे. आजची पिढी उद्याचा भारत घडविणार आहे. त्यासाठी विद्यार्थी केंद्रीत, महिला केंद्रीत कार्यक्रम व शिक्षण हवे. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपण देशासाठी काय करणार आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. परंपरागत रिती-चालीत विद्यार्थ्यांनी बदल घडवून आणून समाजाला नाविन्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी आपले योगदान देणे आवश्यक आहे.’’ मार्गदर्शनानंतर डॉ. माशेलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर मिलिंद तिंबले, विनायक सातोस्कर, डॉ. रामचंद्र करंडे, विठ्ठल सुखटणकर, अरुणा आफोंसो आदी मान्यवर उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष श्यामकांत खोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. आफोंसो यांनी डॉ. माशेलकर यांचा परिचय करून दिला. यावेळी समितीतर्फे डॉ. माशेलकर यांना स्मृतीचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी अजंली माशेलकर स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट शिक्षक व इनोव्हेटीव्ह विद्यार्थी असे दोन पुरस्कार जाहीर केले. नंदकुमार भगत यांनी सूत्रसंचालन केले.