अति तिथे माती!

0
258

महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांमध्ये सरकार स्थापन करण्यात भारतीय जनता पक्ष जरी कसूर ठेवणार नसला, तरी या दोन्ही निवडणुकांत मतदारांनी भाजपचा अहंकार मात्र पुरता उतरवून ठेवला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीवर प्रत्येक निवडणूक सर करता येणार नाही हे तर मतदारांनी बजावले आहेच, शिवाय विरोधी पक्षांनाही निकालात काढण्याची घाई एवढ्यात करू नये असेही निकालातून सूचित केले आहे. खरे तर या दोन्ही निवडणुका एकतर्फीच होतील आणि भारतीय जनता पक्ष सुसाट पुढे निघून जाईल असाच अंदाज तथाकथित राजकीय निरीक्षक व्यक्त करीत होते आणि प्रसारमाध्यमे ते उचलून धरत होती. यच्चयावत मतदानोत्तर पाहण्यांनी देखील भाजपाचा वारू सुसाट असल्याचेच सांगितले होते. त्यामुळे भाजपा या निवडणुकांत दणदणीत विजय संपादन करील असे एकंदर चित्र देश पातळीवर निर्माण झालेले होते. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी या भलत्या अपेक्षांचा नक्षा उतरवला असे निवडणूक निकाल सांगतो आहे. हरियाणामध्ये तर सकाळपासून विरोधकांनी भाजपला तुल्यबळ लढत दिली. कॉंग्रेसने तर जोर दाखवलाच, परंतु वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या दुष्यंत चौटालांच्या जननायक जनता पक्षानेही चमकदार कामगिरी केली. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यामुळे तात्काळ त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचेही प्रयत्न चालवले. महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीतील दिग्गज नेत्यांची पळवापळवी निवडणुकीपूर्वी झालेली होती, परंतु तरीही महाराष्ट्राच्या काही भागांत, विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये भाजपा विरोधी लाटही दिसून येेत आहे. खरे तर कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने या निवडणुकीआधीच महाराष्ट्रावर पाणी सोडलेले होते, परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसशी असलेली युती आणि तिचे नेते शरद पवार यांनी निकराने दिलेली झुंज याचा आयता फायदा कॉंग्रेसलाही मिळाला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या तळागाळाची खडान्‌खडा माहिती असलेले मुरब्बी राजकीय नेते आहेत. या निवडणुकीत भाजपाने त्यांना सर्वतोपरी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविषयी खालच्या पातळीवरची भाषा तर वापरली गेलीच, परंतु निवडणुकीच्या ऐन तोंडावर ईडीची नोटीस पाठवून सूडाचे राजकारण खेळले गेले. राजकारणाचे भरपूर पावसाळे पाहिलेल्या पवारांनी स्वतःच ईडीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याप्रती सहानुभूतीची एक लाट महाराष्ट्रातील मूळच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच विचारांच्या असलेल्या मतदारांमध्ये उसळल्याचे पाहायला मिळाले. त्यात सातार्‍याच्या जाहीर सभेमध्ये तुफानी पावसांत पवारांनी निर्धाराने केलेले भाषणही भावनिक साद घालण्यात प्रभावी ठरले. मध्यंतरी येऊन गेलेल्या पूरपरिस्थितीला हाताळण्यात भाजपा नेतृत्वाला आलेल्या अपयशाचा आणि विविध ठिकाणी झालेल्या बंडखोरीचा फटकाही भाजपला बसलेला आहे. परिणामी २२० पार जाण्याची स्वप्ने पाहणार्‍या भाजपाचा घोडा अडला तो अडलाच. मित्रपक्ष शिवसेनेने त्या तुलनेत दिमाखदार कामगिरी केली आहे. कमी जागा लढूनही अधिक जागा जिंकण्याच्या दिशेने त्यांनी घोडदौड चालवली. भाजपाला एकहाती सत्ता मतदारांनी दिलेली नाही, त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व वादातीत वाढले आहे. त्याचा पुरेपूर फायदा सेना उठविल्याशिवाय राहणार नाही. निकाल पुरते येण्याआधीच संजय राऊत ‘फिफ्टी फिफ्टी’ म्हणाले आणि उद्धव ठाकरे यांनीही निकालानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत जी काही भाषा वावरली, त्यातून सूचित होणारी गोष्ट महत्त्वाची आहे. सत्तेतला कलगीतुरा याच्याही पुढे चालू राहील असेच हे संकेत आहेत. शिवसेना भाजपाशी सौदेबाजीची एकही संधी यापुढे सोडील असे वाटत नाही. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक नेत्यांची नवी पिढी या लढतीत उतरलेली होती. रोहित पवारांपासून आदित्य ठाकरेंपर्यंत त्यातील अनेकांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर उदय झालेला आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही लगोलग राजीनामा देऊन भाजपात निसटलेल्या उदयनराजेंसारख्यांच्या सत्तालालसेला मतदारांनी फटकार लगावली आहे. भाजपापाशी केंद्रातील भरभक्कम सत्ता आहे. त्यामुळे सरकारे स्थापन करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हातचा मळ आहे, परंतु ज्या सन्मानाने ही सत्ता स्थापना त्यांच्याकडे चालत यायला हवी होती, तशी ती आलेली नाही हे मात्र निश्‍चित आहे. देवेंद्र फडणविसांनी केवळ बंडखोरांवर आपल्या जागा कमी होण्याचे खापर फोडले ते पटणारे नाही. सहा मंत्री पराभूत का झाले तेही त्यांना सांगावे लागेल. विरोधी पक्षांचे अस्तित्व या दोन्ही राज्यांत टिकून राहिले आहे ही लोकशाहीच्या दृष्टीने आश्वासक बाब आहे. निकाल अगदीच एकतर्फी झालेले नाहीत आणि विरोधी पक्षांनी जरा अधिक मेहनत घेतली तर ते पुन्हा उभारी घेऊ शकतील आणि किमान सक्षम विरोधकाची भूमिका निभावू शकतील हेच या निवडणुकांनी पुन्हा एकवार दाखवून दिले आहे. अर्थात, आधीच आपला पराभव मान्य करून बसलेल्या विरोधकांमध्ये नव्याने उभारी घेण्याचा हुरूप तर हवा!