अण्णा नावाचे विद्यापीठ

0
139

– प्रा. मिलिंद जोशी, साहित्यिक-विचारवंत

हत्त्वाचे संशोधन विद्यापीठ होते. गेली साठ वर्षे कोणत्याही वेतनआयोगाशिवाय, अनुदानाशिवाय, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांशिवाय हे अण्णा नावाचे विद्यापीठ अव्याहतपणे आणि अखंडितपणे संशोधनाचे काम करुन महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती वाढवत राहिले. एखाद्या विद्यापीठालाही जे जमणार नाही असे संशोधनकार्य अण्णांनी एकट्याने केलेले आहे. त्यांना भेटल्यावर देव भेटल्याचा आनंद मिळत असे आणि भक्तीभावाने त्यांच्या पायाशी बसण्यात धन्यता वाटत असे. अण्णांना विनम्र आदरांजली वाहताना आता या आनंदाला आम्ही सर्व जण पारखे झालो आहोत याची खंत मनात आहे.

प्राचीन साहित्याचे गूढ अभ्यासक, प्रतिभाशाली संशोधक, व्रतस्थ ज्ञानोपासक, लोकसंस्कृतीचे मिमांसक या नात्यांनी महाराष्ट्राला ख्तानामक असणारे डॉ. रा. चिं. ढेरे यांचे काल निधन झाले. डॉ. ढेरे यांना सर्व जण ‘अण्णा’ म्हणत. अण्णा हे महाराष्ट्रातलेच नव्हे तर भारतातले एक महत्त्वाचे संशोधन विद्यापीठ होते. गेली साठ वर्षे कोणत्याही वेतनआयोगाशिवाय, अनुदानाशिवाय, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांशिवाय हे अण्णा नावाचे विद्यापीठ अव्याहतपणे आणि अखंडितपणे संशोधनाचे काम करुन महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती वाढवत राहिले. एखाद्या पारंपारिक अथवा अभिमत विद्यापीठाला हेवा वाटावा असे हे विद्यापीठ.
प्राचीन आणि मध्ययुगीन मराठी संस्कृती आणि साहित्य अण्णांच्या संशोधनाच्या केंद्रस्थानी राहिले. अण्णांच्या संशोधनकार्याचे वेगळेेपण म्हणजे आपल्या संशोधनप्रकियेत त्यांनी अभिजनांच्या संस्कृतीपेक्षा बहुजनांच्या संस्कृतीला अधिक महत्त्व दिले. ह्यासाठी त्यांनी प्रामुख्याने लोकतत्त्वीय दृष्टीचा अवलंब केला. आपल्या संशोधनप्रवासात त्यांनी परंपरेचा आदर केलाच, त्याचबरोबर अनेक नव्या वाटाही चोखाळल्या. आधुनिक संशोधनपद्धतीचे अवलंबन करतानाच तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र या सार्‍या ज्ञानशाखांचा आधार घेतला. आंतरविद्या शाखीय आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचा सुरेख समन्वय अण्णांच्या संशोधनात सापडतो. अण्णांच्या संशोधनकार्याचे आणखी एक वेगळेपण म्हणजे ते केवळ संशोेधक करुन थांबले नाहीत तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी त्यांनी संशोधनविषयी निर्माण करुन ठेवले.
सर्व सोयींनी सुसज्ज अशा बंदिस्त खोलीत बसून, पूर्वसूरींच्या ग्रंथाचा आधार घेत आणि त्यालाच प्रमाणभूत मानून संशोधन केल्याचा आव आणत, संशोधक म्हणून मिरवणार्‍यांची संख्या या महराष्ट्रात कमी नाही. अण्णांचे वेगळेपण असे होते की संशोधनासाठी कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना व्रतस्थ संशोधकाच्या भूमिकेतून, प्रकृतीच्या असंख्य तक्रारी असतानाही, त्यांनी भारतभर प्रवास केला. ‘वडिली जें निर्माण केलें॥ ते पहिलेें पाहिजें|’ हे समर्थवचन प्रमाण मानून त्यांनी संदर्भस्थळांचे प्रत्यक्ष पर्यटन केले. संशोधनासाठीची सामग्री गोळा केली आणि नंतरच संशोधनाच्या वाटा चोखाळल्या.
अण्णांच्या संशोधनाचा व्याप आणि परिघ ‘अणूपासोनि ब्रह्यांडा एवढा होत जातसे|’ या समर्थवचनाची आठवण येत राहावी इतका मोठा आहे. कधी दत्तसंप्रदाय, कधी नाथसंप्रदाय, कधी वारकरीसंप्रदाय तर कधी महानुभवन संप्रदाय अण्णांच्या संशोधनाचे विषय बनले. भारतीय रंगभूमीचा शोधही त्यांनी तितक्याच मनोभावे घेतला. ‘देवांनाही नाही कळला अंतपार ज्याचा॥ कानडा राजा पंढरीचा॥ असा ज्याचा उल्लेख केला जातो त्या विठ्ठलाने अण्णांना वेड लावले. अठरापगड जातींत विभागलेला समाज ‘विठ्ठल’ नावाच्या ध्वजाखाली एकत्र आणून संतांनी महासमन्वय घडवून आणला. वारी नावाच्या अलौकिक भक्तिनाट्याचे विलक्षण आकर्षण असणार्‍या अण्णांनी ‘श्री विठ्ठल : एक महासमन्वय’ सारखा अलौकिक संशोधन ग्रंथ सिद्ध केला. सोन्या-चांदीच्या ऐश्‍वर्यात भक्तांसमोर प्रकटणार्‍या वेंकटेशाचा वेध अण्णांच्या लेखणीने घेतला. वेंकटेशावर रुसून कोल्हापूरला येऊन राहिलेली आणि करवीरनिवासिनी झालेली महालक्ष्मी त्यांच्या चिंतनाचा विषय बनली. ज्या भवानीला साकडे घालून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ‘दृष्ट संहारिले मागे| ऐसे उदंड ऐकिले| परंतु रोकडें काही| मूळ सामर्थ्य दाखवी|’ असा जाब साक्षात समर्थांनी जिला विचारला होता ती तुळजाभवानी अण्णांच्या संशोधनाचा विषय बनली.
कधी दक्षिणेचा लोकदेव असलेला खंडोबाने, तर कधी शिखर शिंगणापूरच्या शंभूमहादेवाने त्यांना संशोधनासाठी साद घातली. अण्णांनी मराठी संतांच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील विविध लोकदैवतांचा विकासक्रम रेखाटला. भारतातील देवी उपासनेचा उगम आणि विकास स्पष्ट करताना मातृदेवतांचे स्वरुप आणि प्रयोजन, तसेच त्यांचा विकासक्रम ग्रंथबद्ध करताना ‘आनंदनायकी’ आणि ‘लज्जागौरी’सारखे अद्वितीय संशोधनग्रंथ सिद्ध केले. मला कधी कधी असे वाटते, महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या सगळ्या लोकदेवतांना असे वाटले असेल, आपल्या जन्मकथा, आपल्या विषयीच्या लोककथा आणि लोकश्रद्धा, त्यांतून निर्माण झालेली उपासना संस्कृती या सार्‍या गोष्टी अक्षरबद्ध करण्यासाठी एखाद्या मराठी संशोधक-सारस्वताची योजना आपण करावी आणि ते काम करण्यासाठीच त्यांनी अण्णांना जन्माला घातले असावे. जसे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवचरित्रकथनाला उभे राहिले, की इतिहासातले सगळे पराक्रमी वीरपुरुष त्यांना विनंती करीत असतील की माझ्याविषयी बोला. प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यानासाठी उभे राहिले, की शब्दांची लडच्या लड, त्यांच्यासमोर येऊन त्यांना प्रेमपूर्वक बजावत असेल, आम्हाला व्याख्यानात घ्या, आम्हाला व्याख्यानात घ्या. असे अण्णांच्या संशोधनदरबारात देवदेवता रांगेत उभ्या असताना आणि अण्णांना सांगत असतात, आमच्याविषयी लिहा. माणसे देवाच्या दारात रांगेत उभी असतात, पण ज्यांच्या अंगणात देव रांगेत उभे असतात, असा देवमाणूस म्हणजे अण्णा.
अण्णांची संशोधनवाट साधी सोपी सरळ कधीच नव्हती. या वाटेवर ङ्गुलांपेक्षा काटेच अधिक होते. त्यांना टीकाकारांपेक्षा टीकाखोर वृत्तीचे लोक अधिक भेटले. अव्यभिचारी जीवननिष्ठा आणि वाड्:मयनिष्ठा असणार्‍या अण्णांच्या वाट्याला संशोधनाच्या या वेडापायी कोर्टकचेर्‍याही आल्यामुळे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रासही झाला. पण अण्णांची संशोधननिष्ठा तसूभरही ढळली नाही. संशोधनातून गवसलेले सत्य त्यांनी निर्भयपणे सांगितले. ज्ञानाची क्षेत्र गढूळ होत असताना आणि समाजातील सर्व प्रश्‍न अकारण भावनिक करुन तेढ निर्माण करण्याचे षड्‌ययंत्र रचले जात असतानाही ‘सत्य असत्याशी| मन केलें ग्वाही| मानियलें नाही| बहुमता| हा तुकारामांचा निर्भय बाणा अण्णांनी कधीही सोडला नाही. शंभराहून अधिक संशोधन ग्रंथ सिद्ध करून मराठी साहित्यशाखेचा संशोधनदरबार समृद्ध करणार्‍या अण्णांचे १२हून अधिक ग्रंथ कन्नड भाषेत अनुवादित झाले आहेत. अनेक ग्रंथ इंग्रजीतून प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. धर्म, समाज आणि संस्कृती यांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकणारे अण्णांचे असंख्य संशोधनग्रंथ ही महाराष्ट्राची नव्हे तर भारताची सांस्कृतिक समृद्धी आहे. अण्णा असंख्य देशीविदेशी अभ्यासकांचे श्रद्धास्थान आहेत.
अण्णांनी आयुष्यात कधीही नोकरी केली नाही. संशोधनाची आस हीच एकमेव इस्टेट होती. अण्णांनी संशोधाला पूर्णपणे वाहून घेण्याचा निर्णय घेतला. ही एकप्रकारे आनंदाची ङ्गकिरीच होती. दुसरी कसलीही आर्थिक आवक नसणार्‍या अण्णांच्या घराने अण्णांचा पूर्णपणे संशोधनला वाहून घेण्याचा निर्णय कोणताही गाजावाजा न करता सहज स्वीकारला. घराने अण्णामंधल्या संशोधकाला जगण्यासाठी, जवळ असलेला तटपुंजा पैसा निरूपयोगी गोष्टींवर खर्च करण्याची मुभा दिली. गरजांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोचणार नाहीत याची काळजी घेतली आणि त्यांच्या कामाचे व्यावहारिक भले-बुरे ओझे विनातक्रार आनंदाने वाहिले. हे सारे आम्ही तुमच्यासाठी करतो आहोत हा आविर्भाव कधी मिरवला नाही. घरातल्या मंडळीच्या या भरभक्कम पाठिंब्यामुळेच अण्णांमधला एकाकी, हळवा माणूस संशोधक म्हणून स्वाभिमानाने उभा राहू शकला.
अण्णांच्या वाट्याला सारे मानस्मान आले. लोकप्रेमाइतकीच लोकमान्यताही मिळाली. पण ऐन उमेदीच्या काळात अण्णांनी दुर्दैवाचे दशावतार अनुभवले. दुःख आणि दारिद्य्र त्यांच्या पाचवीलाच पूजलेले होते. चमत्कारिक घटनांनी त्यांचे बालपण होरपळून निघाले. संकटांच्याच मालिका सटवाईने त्यांच्या पत्रिकेत लिहिल्या होत्या. पण प्राप्त परिस्थितीचा संयमाने स्वीकार करत श्रद्धाळू अण्णा वाटचाल करत राहिले आणि त्यांच्या कर्तृत्त्वाच्या शिखराला अभिवादन करण्यात नंतर नियतीनेही धन्यता मानली.
‘लोकसंस्कृतीचे प्रतिभादर्शन’ या अण्णांच्या गौरवग्रंथात या ग्रंथाचे संपादन करणार्‍या त्यांच्या कन्या डॉ. अरुणा ढेरे यांनी लिहिले आहे, ‘कला, दारिद्य्र आणि शिवाय भलेपण यांचे एकत्र येणे नेहमीच यातनामय असते. अण्णा तसल्या आयुष्याला गाठी बांधून मोठे झाले. दुबळी सोशिकता घेऊन मोठे झाले. निरपेक्षा माय ापोरक्या मुलाला कधी कधी जे अतिहळवेपण देते, ते घेऊन मोठे झाले. निर्धनाला न परवडणारा स्वाभिमान घेऊन मोठे झाले.’
संशोधनाची वाट चोखाळताना अण्णांनी पूर्वसुरींना कधीही निकालात काढले नाही. इतिहासाचार्य राजवाडे, सारस्वतकार भावे, वासुदेवशास्री खरे, ना. गो. चापेकर आणि रावबहाद्दूर पारसनीस यांच्या संशोधनातल्या चुका निदर्शनाला जरूर आणून दिल्या; पण त्यांचे काम नव्याने विस्तारताना त्यांच्या योगदानाचे महत्त्वही अधोरेखित केले आणि त्यांच्या ऋणाचीही आठवण ठेवली. अण्णांनी संतसाहित्याचेही अनेक अंगांनी पुनर्मूल्यांकन केले. मराठी साहित्यातल्या अनेक अलक्षित आणि अज्ञात ग्रंथकारांचे त्यांनी संशोधनपूर्वक नवदर्शन घडवले. लोकसाहित्याच्या अभ्याला नवी अध्ययनदृष्टी तर दिलीच; पण त्याचबरोबर लोकसाहित्य समीक्षेची पायाभरणी करून तिला परिभाषाही दिली. महाराष्ट्र संस्कृतीचे भारतीय संदर्भाच्या व्यापक पटलावर अवलोकन करताना अण्णांनी संशोधनक्षेत्राला समग्रतेचे भान दिले. ऍन ङ्गेल्डहाउस, एलिनॉर झेलिऑट, ओदविल किंवा इरिना ग्लुश्कोव्हसारख्या पाश्‍चात्य जाणकार अभ्यासकांनीही अण्णांच्या कामाचे मोल जाणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात धन्यता मानली. एखाद्या विद्यापीठालाही जे जमणार नाही असे संशोधनकार्य अण्णांनी एकट्याने केलेले आहे. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, या संतवचनाप्रमाणे ज्ञानसाधनेतच अण्णा देव शोधत राहिले. देवदेवतांच्या संशोधनात रमणार्‍या अण्णांच्या व्यक्तिमत्त्वात देवत्व पुरते भिनले होते. त्यामुळेच त्यांना भेटल्यावर देव भेटल्याचा आनंद मिळत असे आणि भक्तीभावाने त्यांच्या पायाशी बसण्यात धन्यता वाटत असे. अण्णांना विनम्र आदरांजली वाहताना आता या आनंदाला आम्ही सर्व जण पारखे झालो आहोत याची खंत मनात आहे.