अडीच महिन्यांत ५ कोटींची वीजबिल थकबाकी भरणे अशक्य

0
282

>> महापौर उदय मडकईकर यांची माहिती

पणजी महापालिकेची जी ५ कोटी रु.ची वीज बिल थकबाकी आहे ती पाच हप्त्यांत अडीच महिन्यांत फेडण्याची सूचना वीज खात्याने आम्हाला केलेली असून ते आर्थिकदृष्ट्या आम्हाला शक्य नाही. म्हणूनच आम्ही १५ ऑक्टोबर रोजी जो एक कोटी रु.चा पहिला हप्ता भरणार होतो तो भरला नसल्याचे काल महापौर उदय मडकईकर यानी सांगितले.

वीज खात्याने आम्हाला एक पत्र पाठवले असून १५ ऑक्टोबर रोजी पहिला हप्ता भरून झाल्यानंतर पुढील प्रत्येकी १५ दिवसांत एक कोटी रु.चा हप्ता करावा, अशी सूचना केली आहे, असे सांगून अशा प्रकारे केवळ अडीच महिन्यांच्या काळात पाच कोटी रु. फेडणे महापालिकेला शक्य नसल्याचे आम्ही वीज खात्याला कळवले आहे. महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांनी याविषयी वीज खात्याच्या अभियंत्यांशी चर्चा केली असल्याचे मडकईकर म्हणाले.

१५ ऑक्टोबर रोजी पहिला हप्ता फेडल्यास वीज खाते पुढील हप्ता भरण्यास आम्हाला दोन ते तीन महिन्यांचा अवधी देईल असे आम्हाला वाटले होते. मार्केटमधील दुकानदारांशी करार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास आम्हाला तेवढा अवधी हवा आहे. या करारांवर सह्या झाल्या की आम्हाला १० ते १२ कोटी रु. मिळू शकतात ते मिळाले की आम्ही पुढील हप्ते फेडले असते. पण वीज खात्याने अडीच महिन्याच्या काळात पाच हप्त्यात ही थकबाकी भरण्याची सूचना केली असल्याने आमची योजना बारगळल्याचे ते म्हणाले.