27.4 C
Panjim
Saturday, August 15, 2020

स्वतःवर जिथं प्रेम आहे, तिथं आत्महत्या कशी?

– डॉ. व्यंकटेश हेगडे
श्री. श्री. रविशंकरजींना एकदा विचारलं गेलं, ‘तुमच्याकडे सर्व त्रासांसाठी उत्तर आहे का?’ श्री. श्री. म्हणाले, ‘होय! कारण ९० टक्के त्रास हे मनामुळं असतात; आणि मनाबद्दल जागृती कशी असावी, विचारांचं, भावनांचं आणि ताणतणावांचं व्यवस्थापन कसं करावं ते मी शिकवितो.’
नव्वद टक्के त्रास मनामुळे होतात. आपले मन हे आमच्या जीवनातले एक महत्त्वाचे अंग. एखादी आत्महत्या घडते तेव्हा हे मन त्याला जबाबदार असते. मनात तो विचार येतो. आत्महत्येचा विचार येतो आणि त्यावेळी तो कृतीत आणायचा विचारही येतो. मग निग्रह होतो. एक नकारात्मक विचारांचा प्रवाहच मनात सुरू होतो. कदाचित त्या क्षणी मनात एक मोठा कल्लोळ याच विचारांचा होत असेल. हा विचार नैराश्यातून येतो. नैराश्य ही मनाची एक विचित्र अवस्था. सहनशीलतेपेक्षा जास्त ताणतणाव मनावर पडायला लागला की मन त्या तणावाने दबले जाते.
खरे तर यावेळी आपल्या बुद्धीने, ज्ञानाने मनावरच्या ताणतणावांवर मात करायची असते. प्रचंड ताण पडला तरी तो स्वीकारावा. त्या क्षणी हा ताण, हा प्रश्‍न, हे संकट आहेच; पण ते काही सदैव राहणार नाही. ते बदलणार आहे. आज दुःख आहे तर उद्या सुख येणारच आहे! पण त्रासाचा हा क्षण अपरिहार्य आहे आणि सर्वस्व पणाला लावून तो स्वीकारायचा आहे. ही स्वीकारण्याची आपली क्षमता ओळखायची, वाढवायची. स्वीकारणं म्हणजे परिस्थितीनुसार बदलणं; आणि बदलताना अगदी विनासायास सहज बदलणं. यालाच तडजोड म्हणतात. तीच सहनशक्ती. याचीच खरी आवश्यकता असते.
माझा ‘मी’ अनेक वेळा मला सतावतो. मी मला श्रेष्ठ समजतो. ‘मी मोठा आहे’ या अहंकारातून मला एखादा अपमान अगदी जिव्हारी लागतो. त्यानं ‘मला’ असं केलं?’ ‘मी नापास झालो?’
माझ्यातला ‘मी’ जेवढा मोठा तितकी पराजयात वेदना मोठी. मनाला जखम मोठी. आणि मग ‘हे तोंड लोकांना कसं दाखवावं?’ याची खंत आणि मग ‘त्यापेक्षा मृत्यू परवडला’ ही भावना. अनेकदा अहंकारातून आत्महत्या घडते, तर अनेकदा सहनशक्तीच्या अभावातून. परिस्थितीनुरूप बदलणं म्हणजे कुठल्याही, कसल्याही परिस्थितीत सांभाळून घेणं. हे जिथं जमतं तिथं कधी पराजय नसतो. तो खरा यशस्वी होतो.
अनेकवेळा मुलांना घडवताना, वाढवताना पालक त्यांना हवे ते लगेच आणून देतात. पण त्यामुळे एक होते- मुलांना हवे ते लगेच आणून देणे किंवा मागण्यापूर्वी आणून देणे यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना वाट पाहावी लागत नाही. एखाद्या वस्तूची… अगदी आवडीच्या वस्तूची वाट पाहणे, त्यासाठी तळमळणे यातून सहनशक्ती वाढते. त्या वस्तूची किंमत कळते.
मुलांना आम्ही दटावत नाही. शिक्षा देणे तर सोडाच, पण अतिलाडांमुळे त्यांच्या चुकाही त्यांना दाखवून देत नाही. खरे तर त्यामुळेच त्यांना जीवनात विरोध सहन होत नाही. आईवडिलांनी आज एक थप्पड दिली तर ती आजची चूक सुधारतील आणि मनाला योग्य वळण लागेल. मग पुढे पोलिसांकडून किंवा समाजाकडून थपडा खाव्या लागायच्या नाहीत.
म्हणून संस्कार महत्त्वाचे. त्या संस्कारांतून मन घडावं. शरीर घडावंच, पण मनाची चांगली मशागत व्हावी. मनात मानवी मूल्ये रुजावी. मनात करुणा राहावी. ही करुणा सर्वांसाठी असावीच, पण स्वतःसाठीही असावी. स्वतःवर प्रेम करणारा, स्वतःची करुणा असणारा, स्वतःशी मैत्री असणारा स्वतःचा नाश कसा करेल? आणि नैराश्याचं मुख्य कारण ‘माझं कसं होईल?’ ही चिंता. ‘मी’ आणि ‘माझं.’ ही चिंता दूर होण्यासाठी ‘माझं कसं होणार?’ हा विचार ‘मी समाजासाठी कसा उपयोगी होऊ’ यात परिवर्तित व्हावा. आत्महत्येचा विचार येतो किंवा नैराश्य येते (खूप राग येतो. जीवनात रस नसतो. उत्साह कमी होतो. काही करावंसं वाटत नाही. नकारात्मक विचार येतात. रडायला येतं.) तेव्हा कुठंतरी जाऊन सेवा करावी. डॉक्टरांचं औषधही घ्यावं.
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते तर आज जगामध्ये नैराश्याचे प्रमाण खूपच वाढलेय. मुलांचे कमकुवत मन आणि त्यावर सहन न होणारा ताणतणाव. कधी अभ्यासाचा तर कधी पराभवाचा. आज मुलं टीव्ही, इंटरनेट आदी माध्यमांतून पूर्ण जगाशी जोडली गेली आहेत. युवावस्थेत त्यांच्या शरीरात होणार्‍या विविध ग्रंथींच्या उगमामुळे थोडा मनावर परिणाम होतोच. त्यावेळी जर काही प्रक्षोभक किंवा भावनांना चाळविणारं पाहणं झालं तर एक भावनिक उद्रेक होतो. या देशाची संस्कृती वेगळी आहे. वातावरण वेगळं आहे. लैंगिक भावनांमुळे मनावर खूप मोठा परिणाम होतो. मग कदाचित प्रेमप्रकरणातील अपयश, शिक्षणातील अपयश… अनेक कारणे… नैराश्याकडे नेणारी. पण एक महत्त्वाचे- आत्महत्येचा विचार आला तर पालकांशी तो व्यक्त करण्याइतपत नाते पालकांचे मुलांशी असावे. तिथे तशी जवळीक असावी.
खरं तर पालक आणि शिक्षक यांचं मुलांवर बारीक लक्ष असावं. एक असं नातं असावं जिथं मुलांच्या मनात काय चाललंय याचा सुगावा पालकांना व शिक्षकांना लागावा. त्याचं बोलणं, वागणं, संगत, प्रगती, झोपणं, राहणीमान सर्वांवर लक्ष हवा.
आत्महत्या करणार्‍यांचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व असतं. ते ओळखावं लागतं. म्हणून आपण जबाबदारीने वागावं. नात्यांतील तणाव, नवरा-बायकोचं भांडणं यामुळेही आत्महत्या घडतात. मुख्यत्वे सोबत्याच्या बाहेरख्यालीपणाबद्दल संशय व्यक्त केला जातो. नात्यांतील प्रामाणिकपणातून कितीतरी आत्महत्या थांबतील. व्यसनं बंद झाली तरही थांबतील. मुख्यत्वे सहनशीलता वाढली तरही थांबतील. एखादा आजार कुणी सहन करू शकला नाही किंवा आजाराची अवास्तव भीती हे एक आत्महत्येचे कारण असू शकते. पश्‍चात्तापातूनही आत्महत्या होतात. मन हे माकडासारखे असते. अगदी उच्छृंखल! पण आपल्या मनात येणार्‍या विचारांबद्दल प्रत्येकात जागृती हवी. कुठला विचार कृतीत आणावा आणि कुठला विचार सोडून द्यावा हे बुद्धीने ठरवावं. यासाठी बुद्धीचा योग्य वापर व्हावा. बुद्धीतून अंतःकरणात स्मितहास्य उगवणारं आणि सदैव ते ओठांत असणारं ज्ञान द्यावं. जीवनाकडे एका विशाल नजरेनं पाहावं. जीवनावर सदैव प्रेम करावं आणि भारतीय श्रीमंत संस्कृतीतील ज्ञानाचा योग्य उपयोग करून जीवन सुगंधित करावं. समुपदेशन म्हणजे योग्य ज्ञानातून परिवर्तन. कवी कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात- ‘चारी पुरुषार्थांची झिंग देणार्‍या जीवनाच्या द्रवावर प्रेम करावं.’ हो, एक खूप सुंदर गोष्ट घडलीय. काहीतरी खूप मौल्यवान मिळालंय. या सुंदर सृष्टीमध्ये मानवी जन्म मिळाला. हा सुंदर देह मिळाला. मन, बुद्धी, कर्तव्य, ज्ञान यातून स्वतःचं जीवन किती सुंदर होऊ शकतं याचा पूर्ण अनुभव घ्यावा. श्री. श्री. रविशंकर म्हणतात, ‘जीवनात अठ्‌ठ्याण्णव टक्के सुख आहे आणि दोन टक्के दुःख.’ पण आपलं मन त्या दोन टक्के दुःखाला चिकटतं. हो, यात त्रास असेल, पराभव असेल, एखादी मोठी घटना घडेल. कितीतरी चांगल्या सुख देणार्‍या गोष्टींपासून आम्ही वंचित राहू. एखाद्या अतिप्रिय माणसाचा मृत्यूसुद्धा घडेल. पण म्हणून काय आकाश कोसळलं नाही. आत्महत्येचा तर विचार करायची गरज मुळीच नाही. हे जीवन आहे. इथे आव्हाने झेलायची आहेत. धीराने टक्कर द्यायची आहे. आपल्यात दडलेला सिंह गरज पडली तर जागवीत कठीण परिस्थितीवर मात करायची आहे. यातून सुटण्याचा आत्महत्या हा मार्ग खचितच नव्हे. जे आहे त्याबद्दल सदैव कृतज्ञ राहत हा मार्ग चालायचा आहे….

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

मन हो श्यामरंगी रंगले…

मीना समुद्र कृष्णाचं संपूर्ण जीवन म्हणजे मानवाला अनाकलनीय वाटणार्‍या अनेक विलक्षण घटनांची गुंफण. एकता, समानता, सत्यता, मित्रत्व, सख्यत्व, पावित्र्य, मांगल्य, सेवाभाव, निर्भयता याचं प्रतीक...

समाजात फूट पाडण्याचे देशविरोधी षड्‌यंत्र

 दत्ता भि. नाईक भारतातील जनजातींचा स्वाभिमान व पराक्रमाचे प्रतीक असलेला १५ नोव्हेंबर हा भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस. आणि हाच खर्‍या अर्थाने भारत देशातील...

भारतातील वृक्षविशेष

डॉ. सोमनाथ कोमरपंत नारळीचे झाड मूळचे कुठले याविषयीचा थांगपत्ता लागत नाही. काहीजण ते दक्षिण अमेरिकेतील असावे असा अंदाज व्यक्त करतात. हिंदी महासागराच्या कोकोस बेटांवरून...

कोरोना… माणूस… माणुसकी….

 पौर्णिमा केरकर एक महिनाभर सुनीलचे कुटुंबीय प्रचंड दडपणाखाली वावरत होते. ते दडपण कोरोनाचे नव्हते तर समाजमनाच्या मानसिकतेचे होते! विज्ञान शिकलेली, आरोग्यसेवेत असलेली माणसेही कशी...

सोने कडकडणार?

 शशांक मो. गुळगुळे सोन्याची किंमत सध्या १० ग्रॅमसाठी ५० हजार रुपयांच्या पलीकडे गेली आहे. सोनेबाजार व्यवस्थेतील ‘अनालिस्ट’च्या मते सोन्याचे भाव येत्या भविष्यात ८० हजार...