27.6 C
Panjim
Saturday, August 15, 2020

मन झाले ओलेचिंब…

  •  अंजली आमोणकर

पाऊस हा निसर्गाचा सर्वांत सर्जनशील अवतार. जणुं सृष्टीच्या कर्त्याला सुचलेली कविता; निसर्गातील उत्कट संगीत. ‘मन उधाण वार्‍याचे…’- करत घरातून शाळेत, शाळेतून कॉलेजात, कॉलेजातून रस्ताभर व रस्त्यावरून परत विविध गावात- शहरात- घरात असा भेटत जाणारा पाऊस…..

खरंतर पाऊस म्हणजे एकीकडे स्वतःच एक कविता, एक संगीत रचना आणि म्हटलं तर सार्‍या स्वरशब्दांपलीकडे उभा असतो. डोळ्यांत पाणी येईपर्यंत वाट पहायला लावणारा आणि तरीही आला की पुन्हा एकदा कविता आणि गाणी होऊन कोसळणारा.

अकस्मात पावसाची धडक आली व मी हातातले काम टाकून गच्चीवर धावले. कपडे नव्वद टक्के सुकले असणार अन् आता काहीही सुगावा न लागू देता आलेली ही धडक!! एकदम दोन मजले धावत धावत चढल्याने मला प्रचंड धाप लागली. पण कपडे काढताना अंगावर बरसणार्‍या धारांनी, जीव एकदम शांतावला. कपडे आत ठेवून मी गच्चीवर पावसात फिरत राहिले. सोसाट्याचा वाराही होताच. तेवढ्यात गच्चीचे आपटणारे दार लावायला चिरंजीव वर आले. बघतात तो काय, साक्षात माताश्री पावसात चिंब होऊन न्हातायत…! ‘‘अगं अगं, मम्मा हे काय आरंभलयस? आजारी पडायचंय का?’’- लहानपणी त्याला ऐकवलेले संवाद तो आता मला ऐकवत होता. ‘‘नाही रे, पहिल्या पावसानं घामोळं जातं म्हणे! माझं सगळं अंग भरलंय घामोळ्यानं म्हणून भिजतेय!!’’
‘‘कर्म! अगं, कसला पहिला पाऊस घेऊन बसलीयेस! ऍसिडिक असतो हा सुरुवातीचा पाऊस!! चल् चल् आत!!’’ आत आले. (यावंच लागणार होतं. दात वाजायला लागले होते, अंग कडकडत होतं) चिरंजीवांना चहाचं आधण ठेवायला पिटाळत मी केस टॉवेलमध्ये बांधले व कपडे बदलून गरम गरम आल्याचा चहा घ्यायला हजर झाले.
पावसाळा, माझा अत्यंत आवडता ऋतु!! लहानपणापासून तो, ह्या ना त्या रूपात, मला आसुसून भेटायला धावलाय. त्याची ती असंख्य लडिवाळ रुपं मी, काळजात कोरून ठेवलीयत.

लहानपणी दिल्लीला, पावसाचं दिमाखदार रूप कधी पाह्यलंच नाही. पावसानं गल्ल्याबोळ धो धो वाहताना कधी नजरेस पडलेच नाहीत. कधीतरी चुकून लहानशी बातमी यायची यमुना नदी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढलीये म्हणून. पण तरी ती पातळी कधीच क्रॉसही व्हायची नाही व कधी पूरही यायचा नाही. कोकणातल्यासारखं लागून आठ आठ दिवस आपला पडतोय पाऊस वेड्यासारखा! असंही पाहिलं नाही. तरी लोक पावसाला जाम टरकून असायचे. कारण त्याचं आक्रस्ताळं रूप. तिथे पाऊस म्हणजे फक्त गारांचा मारा. फुटाण्या -एवढ्या आकारापासून ते संत्र्याएवढ्या आकारापर्यंतच्या गारा! साड्‌साड् करत, थयथय नाचत ज्या येणार, त्या दोन मिनिटात सगळं नगर लाह्या सांडल्यागत पांढरं शुभ्र करून सोडणार! मग दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात अपघात व अपघातग्रस्तांबद्दल वाचायचं.
मग मुंबईचा पाऊस भेटला. दर सुट्‌ट्यांमध्ये सतत रिपरिप करत पडतच राहणार. मध्येच एखादी चुकार धडक. बाकी फक्त राड, चिखल व रिपरिप. आणि नंतर मिठी मारली गोव्याच्या पावसाने. कोकणाच्या तोडीस तोड. एकदा झड लागली की आठ-आठ दिवस उघाड नाही. धुवांधार जलधारा. ‘‘पाणीच पाणी चहुंकडे गं बाई गेला मोहन कुणीकडे’’ची प्रचिती देणारा.

पाऊस पडताना जरी सगळीकडे समान दृष्यं असली, तरी वेगवेगळ्या नद्यांवर पडणारा पाऊस बघण्यात मोठी मजा येते. त्यांपैकी दोन नद्या म्हणजे हरिद्वारची गंगा (उत्तर भारत) व पेरियार (दक्षिण भारत). भर पावसात नदीचं पात्र तुमच्यावर गारूड करीत, कुर्‍हाडीच्या घावासारखं घाव घालीत नुसतं भीषणपणे धो धो वाहात असतं. अन् वरून सगळे त्रिखंड बुडवून संपवण्याच्या इच्छेसारखा पाऊस जर कोसळत असेल, तर ते रौद्र, घुसळत वाहणारं गढूळ पाणी, फुंफाटात ज्या वेगानं दौडत असतं त्याला तोड नाही. समग्र आकाश, नदीच्या पात्रात प्रतिबिंबीत झालेलं असतं. सहस्त्रधारांना खीळ नसते. गार वारे अंगाला सुयांसारखे टोचत असतात. छत्र्या उलट्या होतात. काहीच उपाय न उरून आपण शेवटी विरक्त होऊन, चिंब भिजत, जलधारांना चुंबित उभे असतो. कानठळ्या बसवणारे मेघगर्जन होते. पावसाचा वेग वाढतो. आसमंत धुक्याने भरतो. बोरांएवढ्या जाड, पाण्याच्या दाट लडी, अंगावर मार दिल्यासारख्या सपासपा बसत असतात.

पण तोच पाऊस, ऋतु संपता संपता एखाद्या नवोढेप्रमाणे मुरकत मुरकत कोसळतो. अगदी बर्फ किसल्याप्रमाणे धारा पाडणारा. वारा स्तब्ध. रिमझिमत येणारा हा पाऊस, एखाद्या खट्याळ पोरासारखा अंगभर लपेटून मग पावलांत गोळा होत असतो. मध्येच मेघांची अस्तर फोडून येणारी सूर्याची किरणं, पावसाला मणी बनून ओघळवतात. पाण्यावर फुलं नाचवतात.
याच आषाढात, पाऊस न चुकता आठवण करून देतो कालिदासांच्या ‘मेघदुता’ची. यक्ष मेघाला अवंतीनगरीला जायला सांगतो. तेव्हाची ती मेघांची पावसाची वर्णनं मनात घुमत असतानाच, शलाका माटेंची एक कविता मनांत ठाणच मांडून बसते.

‘‘माझ्या मनातला साहित्यिक पाऊस वर्षभर,
बरसत असतो.
कथेतील शब्द सरींवर सरी होऊन बरसतात.
कादंबरीचे शब्द एकामागून एक कोसळत राहतात.
ललितचे शब्द मन ओलेचिंब करत रिमझिमत येतात.
समीक्षा ढगांचा गडगडाट करत गर्जत येते.
कवितेची श्रावणसर मन धुंदावत राहते.
असा हा साहित्यिक पाऊस, फक्त माझ्या मनांत बरसतो
मनाबाहेरचा कागद मात्र टेबलावर कोराच राहतो.
कोरा आणि कोरडा राहतो.’’

हळूहळू आषाढ संपतो आणि श्रावणातला पाऊस चक्क ‘झिम्माड’ बनत आपल्या भेटीला येतो. ऊन-पावसाची लपाछपी सुरू होते अन् कवितांचं उदंड पीक येतं. पाऊस जितका प्राचीन, तितकीच त्यावरची कविताही प्राचीन. आपल्यासाठी त्याचे जुने दाखले मिळतात संतसाहित्यापासूनचे. संत साहित्यातील पावसाची जातकुळी निराळी. संतांच्या शब्दांना अध्यात्म लहडून येते. खरं तर पावसाचा ऋतु हे त्यांच्याकरता फक्त निमित्त. म्हणूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर जेव्हा….
‘घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा’- असे शब्द योजतात तेव्हा ते निव्वळ वर्णनासाठी नसतात. वेगवेगळे कवी आपापल्या स्वभावानुसार पाऊस चितारतात. कुणी काहीही म्हटले तरी कवी अवकाशातून अवतरलेला नसतो आणि अवकाशात जगतही नसतो. इच्छा असो वा नसो, भोवतालाशी एकतर शांतपणे जुळवून घेणे वा मग संघर्ष करणे हा पर्याय. संघर्षाच्या वाटेवर लौकिक अर्थाने यश मिळणे खूप कठीण. त्याच्या जोडीला सामाजिक व राजकीय दट्‌ट्या व घुसळण- या सर्वांपायी कवितेचे भाव व रूप बदलणे स्वाभाविक होते आणि तसेच झालेले आपण पाहतो. कवितांमधले पावसाने हळवे रिमझिम रूप सोडून, सपकारे मारणारे रूप धारण करणे ही त्याचीच परिणती. कवितेतला पाऊस आता धडा देऊन जाणारा पाऊस झालाय. कधी गावंच्या गावं पाण्याखाली जातात तर कधी पावसाचा टिपूस नाही. खरंतर पाऊस म्हणजे एकीकडे स्वतःच एक कविता, एक संगीत रचना आणि म्हटलं तर सार्‍या स्वरशब्दांपलीकडे उभा असतो. डोळ्यांत पाणी येईपर्यंत वाट पहायला लावणारा आणि तरीही आला की पुन्हा एकदा कविता आणि गाणी होऊन कोसळणारा.

लहानपणी पुस्तकात ‘पावसाळ्याच्या धारा येती झराझरा, झाकळले नभ, सोसाट्याचा वारा’, अशी कविता पाठ करताना भेटलेले पावसाचे रूप, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवनवीन रूप धारण करते. पाऊस पडतच आहे. जागा बदलून, प्रवेश बदलून, पण तो थांबलेला नाही. त्यामुळे ग्रेसांच्या ‘पाऊस कधी ऽ ऽ ऽ चा पडतो’ ला ‘हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद स्वराने’चं कोंदण मिळतं.
चित्रकला – कविता – संगीत व सिनेमा या चारही गोष्टींचे, पाऊस चितारण्याचे श्रेय शब्दातीत आहे. पाऊस कविता म्हणून भेटतो. संगीत म्हणून भेटतो. व्यक्ती किंवा घटनेमागे उभं असलेलं वातावरण म्हणूनसुद्धा चित्रपटांतून भेटतो. कारण पाऊस हा निसर्गाचा सर्वांत सर्जनशील अवतार. जणुं सृष्टीच्या कर्त्याला सुचलेली कविता; निसर्गातील उत्कट संगीत. ‘मन उधाण वार्‍याचे…’- करत घरातून शाळेत, शाळेतून कॉलेजात, कॉलेजातून रस्ताभर व रस्त्यावरून परत विविध गावात- शहरात- घरात असा भेटत जाणारा पाऊस जेव्हा महापुराचे थैमान घालतो – धरणांची दारं उघडायला लावून गावोगावी पूर आणतो – श्रावणाच्या मनमोहक सरींनंतर – वादळांचे तडाखे देतो तेव्हा रयतेकडून बोलणीही खातो. शिव्याशापही खातो. लिहिणार्‍या हातांना काय, पावसाचं कोणतंही रूप मोह घालतं, कविता करायला, लिहायला.

पण… हल्लीच्या प्रदूषणाने पावसाचं टाईमटेबलच बदललंय. त्याची अनियमितता इतकी वाढलीय की सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन बळीराजा त्यांत भरडला जातोय. तेव्हा मात्र त्याचे लोभस रूप कुठल्याकुठे हरवून जाते. पण लगेच लक्षात येते की आपलाच निष्काळजीपणा, बेदरकारपणा जेव्हा निसर्गाच्या लक्षात येतो तेव्हा तो स्वतःच चक्रीवादळाचे रूप घेऊन येतो व मंाणसाला ताळ्यावर आणतो.

‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा…’ मधील कौतुक हे हाहाकारात कधी परावर्तित होईल सांगवत नाही. पण म्हणून त्याची प्रतीक्षा- त्याच्या आगमनानंतरचा आनंद, त्याचे लडिवाळ रूप- रौद्र रूप- आक्रस्ताळेपणा…. हे सर्व जिथल्या तिथेच आहे.

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

भिन्न विचारसरणी ः यशाचे गमक

-   प्रा. प्रदीप मसुरकर (मुख्याध्यापक, जीएसएच नामोशी-गिरी) सध्या कोरोनामुळे मुलं आपल्या घरी असतील. त्यांच्याशी सुसंवाद साधा. त्यांच्या विचारांना चालना द्या, त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळा व...

चातुर्मास ः एक आनंददायी पर्व

 नारायणबुवा बर्वे (वाळपई) कोरोना महामारी घालवण्यासाठी भारतासह जगामध्ये हेच भारतीयत्व वापरणे सुरू आहे. शरीर, मन, परिसर स्वच्छ राखणे आणि चातुर्मास पाळणे हेच आहे सोवळे-ओवळे म्हणजेच...

शिक्षण ः अखंड तेवणारा नंदादीप

 सौ. नीता महाजन शाळेतला फळा, खडू, पुस्तक हेच केवळ शिकवण्याचे साधन नाही तर आजच्या या परिस्थितीत मोबाईल, टीव्ही, रेडिओ ही माध्यमे खूप चांगल्या पद्धतीने...

उंच माझा झोका

अक्षता छत्रे कलाकारांचे परिश्रम, त्यांची वेशभूषा, रंगभूषा अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा अधिक सखोलपणे केला गेलेला अभ्यास, तसेच विक्रम गायकवाड व स्पृहा जोशी यांच्या परिश्रमातून सुरेख...

पत्रकार टिळक ः एक कटाक्ष

 प्रा. रमेश सप्रे ‘१ ऑगस्ट’ नियमितपणे येतो नि जागवल्या जातात पत्रकार, लोकनेते, संशोधक असलेल्या लो. टिळकांच्या आठवणी ज्यात प्रामुख्यानं लहानपणच्या शेंगांच्या टरफलांची गोष्ट, नंतरची...