27 C
Panjim
Saturday, August 15, 2020

भेट त्याची!

– अपूर्वा बेतकेकर

निसर्गाला जवळून पाहायची इच्छा खूप दिवसांपासून होती. लवकरच नेत्रावळी येथील सावरी धबधबा पाहायला जाण्याची संधी चालून आली. सांगे तालुक्यातील हा छोटासा गाव. वनराईने पूर्णपणे आच्छादलेला. त्यातील डोंगरमाथ्यावरून हा सावरी धबधबा वाहातो. त्याला भेट द्यायला गेले त्यावेळी बरोबर महाविद्यालयीन विद्यार्थीही होते. आधीच निसर्ग मुग्ध आणि सोबत त्याच्या एवढेच मनाला भूरळ घालणारे तरुण म्हणूनच कदाचित त्याक्षणी निसर्गाला आव्हान करण्याची आतुरता अधिकच दाटून आली होती.

पावसाळी अशा वातावरणात आम्ही तिथे पोचलो तेव्हा पूर्णपणे भारावूनच गेलो. श्‍वासांची उत्कटता रोखून धरणारा तो परिमळ त्या ठिकाणी सर्वप्रथम जाणवला. माझी पावले इतरांबरोबर त्या प्रशांत धारेकडे वळू लागली तशी मनाची स्पंदने अधिकच तीव्र झाल्याचा भास झाला. आजूबाजूची वनराई इतकी मनस्वी होती की जणू तिच्याशी थोडी हितगूज करावी. समोरच्या माळरानात कधी न पाहिलेली तर कधी पाहिलेली वनस्पती, चेहर्‍यावरील अहंभाव दूर करणारी ती निमुळती पायवाट, त्यांनी जणू सर्वांचीच मने जिंकली होती. मला बघून ‘मी तुझीच वाट बघत होते’ असे काहीबाही ती वाट पुटपुटली. ती पायवाट, मध्ये मध्ये भेटणारा तो ओहोळ अन् ती हिरवळ…. एकाच क्षणात मनात काहूर माजवून पुन्हा निश्‍चल करणारे होते, सर्व काही. स्वागतासाठी उंच उंच गगनचुंबी वृक्षे ओणवलेली दिसली. त्यांना अभिवादन करून सांगावेसे वाटले ‘तुम्हाला भेटून आनंद झाला!’ पण नुसतेच ओठ रुंदावून मी ती भावना व्यक्त केली, त्यांनी ते पाहिले का कुणास ठाऊक! त्यांना ते कळले असावे. निसर्गाला सगळच माहीत असतं म्हणे. त्याच्या एवढा स्थितप्रज्ञ दुसरा कोणी नाही. त्याच्यापासून काहीही लपवता येत नाही. अगदी पापणी खालील डोळ्यांच्या काठोकाठ भरलेले पारदर्शक पाणीही.
काही वेळ पायपीट केल्यावर जे छोटे-मोठे नदीचे ओहोळ भेटतात, त्यांना पाहून माणूस काय कॅमेर्‍यासारखी एखादी निर्जीव वस्तूही विरघळेल. पण खरोखरच त्या ठिकाणी दरवळणारा तो आजूबाजूचा आसमंत इतका आल्हाददायक होता की वस्तूतील भावना जाग्या व्हाव्यात यात काही आश्‍चर्य नाही. दुसर्‍याचा विनाकारण हेवा करणारा एखादा कुत्सित जीवही इथे येऊन भावुक होऊन जाईल. निसर्गाने आपल्याला काय दिले? खूप काही. पण निसर्गाने आपल्याला प्रेम करण्याची संधी दिली आहे… कदाचित याची जाणीव याक्षणी त्या संकुचित मानवांना होईल.
ही पायवाट अत्यंत खडतर, पण असे काही नाही की निराश व्हाल. उलट ती तुम्हांला पुढे जाण्यास प्रोत्साहन देईल. काही गोष्टी जगणं अशक्य करून टाकतात. तर काही गोष्टी निराश आणि हताश करतात. पण अशा ठिकाणी तुम्ही याल तेव्हा आयुष्य पुन्हा नव्याने जगायची आशा दृढ होईल. त्याच्या सानिध्यात काही क्षण घालवून पाहा. तुम्हांला तुमच्या अस्तित्वाची जी जाणीव व्हायला हवी त्याहीपेक्षा त्याची होईल व तुम्ही त्यात हरवून जाल. स्वतःला निष्कारण शोधण्यापेक्षा तुम्ही त्याच्या गूढतेत मलीन होऊन जाल.
त्यातच मधून मधून भेटणार्‍या नदीचा प्रवाह ती वाट परावर्तित करणारा होता. कदाचित ती त्या धबधब्याला भेटून आली होती म्हणून एवढी बेभान झाली होती. पण तिचं ओठातल्या ओठात लाजणं जाणवत होतं. निशब्द कोलाहल माजवणारी ती खरोखरची आनंददायिनी होती. न बोलता एखाद्या तरुणीचं खळखळून हसणं मला आठवलं. अरे! हिचा परिचय करून द्यायला विसरलीच. ही माझी एके काळची सखी. पूर्वी तिला काही सांगायचे राहून गेले होते म्हणून धबधब्याने पुन्हा तिची अन् माझी भेट घडवून आणली. रात्री अंधाराशी व दिवसा नदीशी हितगूज करावे. किती आकर्षक आहे ही कल्पना! कल्पनेचे हेच उतार चढाव पार करून मी शेवटी त्या विक्राळ धबधब्याकडे येऊन पोचले. सर्वप्रथम मी त्याच्या जवळ जाऊन त्याला बिलगण्याचा प्रयत्न केला. क्षणिक त्यातील गूढता जाणवली. ‘माझ्यापासून दूरच रहा. एवढी उतावळी होऊ नकोस.’ असं काहीबाही तो म्हणाल्याचा आवाज आला. पण मी त्याला न जुमानता त्याच्या अगदी चार पावलं जवळ गेले. आणि क्षणात त्याने मला आपल्या इच्छा शक्तीने दूर लोटले. मला त्याचा रागच आला. पण निसर्गाचे नियम ङ्गक्त त्यालाच माहीत होते.
‘माझ्यावर इतकं प्रेम करू नकोस की तू मीच होशील’ असे तो म्हणाला; तेव्हा मी मागे सरले.
माझे सांत्वन करण्यासाठी पुन्हा तो म्हणाला ‘मी तुझ्यातच आहे.’
मी म्हणाले ‘ठिक आहे.’
रुसव्या ङ्गुगव्याने मी त्याचा निरोप घेतला. लवकर घरी परतायची क्षुल्लक घाई होती. पुन्हा तीच पायवाट तुडवायची होती नदीच्या प्रवाहाबरोबर. उतरतीला गावातील लोकांच्या डोळ्यात पुन्हा तो दिसला. आता मात्र मी गहिवरले. जाताना प्रवासात अचानक मनात तो तरळून गेला. डोळे पाणावले. ‘खरंच तो माझ्यातच होता.’
…………

 

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

भिन्न विचारसरणी ः यशाचे गमक

-   प्रा. प्रदीप मसुरकर (मुख्याध्यापक, जीएसएच नामोशी-गिरी) सध्या कोरोनामुळे मुलं आपल्या घरी असतील. त्यांच्याशी सुसंवाद साधा. त्यांच्या विचारांना चालना द्या, त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळा व...

चातुर्मास ः एक आनंददायी पर्व

 नारायणबुवा बर्वे (वाळपई) कोरोना महामारी घालवण्यासाठी भारतासह जगामध्ये हेच भारतीयत्व वापरणे सुरू आहे. शरीर, मन, परिसर स्वच्छ राखणे आणि चातुर्मास पाळणे हेच आहे सोवळे-ओवळे म्हणजेच...

शिक्षण ः अखंड तेवणारा नंदादीप

 सौ. नीता महाजन शाळेतला फळा, खडू, पुस्तक हेच केवळ शिकवण्याचे साधन नाही तर आजच्या या परिस्थितीत मोबाईल, टीव्ही, रेडिओ ही माध्यमे खूप चांगल्या पद्धतीने...

उंच माझा झोका

अक्षता छत्रे कलाकारांचे परिश्रम, त्यांची वेशभूषा, रंगभूषा अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा अधिक सखोलपणे केला गेलेला अभ्यास, तसेच विक्रम गायकवाड व स्पृहा जोशी यांच्या परिश्रमातून सुरेख...

पत्रकार टिळक ः एक कटाक्ष

 प्रा. रमेश सप्रे ‘१ ऑगस्ट’ नियमितपणे येतो नि जागवल्या जातात पत्रकार, लोकनेते, संशोधक असलेल्या लो. टिळकांच्या आठवणी ज्यात प्रामुख्यानं लहानपणच्या शेंगांच्या टरफलांची गोष्ट, नंतरची...