27.6 C
Panjim
Saturday, August 15, 2020

बैलगाडी

– संदीप मणेरीकर

‘माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो’
परवाच या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या आणि मन गावाकडच्या बालपणीच्या मधूर आठवणींत रममाण झालं. ‘बैलगाडी’! एकेकाळी या बैलगाडीचा डामडौल काय वर्णावा असा होता. आज चारचाकी गाड्यांनाही एवढा भाव नाही तेवढा त्या काळी या बैलगाडीला होता. पूर्वीच्या काळी असलेले पाटील, देशमुख अशा वतनदारांकडे गावातील प्रतिष्ठितांकडे ह्या बैलगाड्या असायच्या. त्यामुळे त्यांचा डौलही राजबिंडाच असायचा. भारत स्वतंत्र झाला आणि त्यांचा हा डामडौल कालांतराने निघून गेला. या बैलगाड्या मग त्या मालकांच्या रोजीरोटीचे वाहन, साधन झाल्या. पण त्यांचा बडेजाव काही कमी झाला नाही.
माझं गाव मोर्लेबाग – घोटगेवाडी, ता. दोडामार्ग, सिंधुदुर्ग. गावात पूर्वी मातीचा रस्ता होता. हा रस्ता रक्ताशी नातं सांगणारा होता. रस्त्यावर धूळ होती, पण त्यात एक जिवंतपणा अनुभवायला मिळत होता. कारण तिथून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची पावलं धुळीवर उमटत होती. कोणतंही वाहन गेलं की रस्ता धूळ उडवत आपला आनंद साजरा करत होता. कारण अशी वाहनंही क्वचितच त्या रस्त्यानं जात होती. आमच्या गावाच्या पलीकडे असलेल्या डोंगरावरची झाडं नेण्यासाठी ट्रक यायचे; तेही क्वचित. आणि संध्याकाळी वस्तीला सावंतवाडीहून येणारी एसटी बस. क्वचित मोटारसायकल. सायकलींचा प्रवास मात्र मोठा होता. कारण सायकली मोठ्या संख्येने ङ्गिरत होत्या. आणि त्यांच्यासोबत आपल्या घुंगरांच्या तालावर अख्ख्या जगाला ताल धरायला लावणार्‍या छुन्नक छुन्नक अशा बोलांवर नादमय संगीत देणार्‍या ‘बैलगाड्या.’
दोन बैल, दोन मोठ्ठी चाकं, त्या चाकांवर बसवलेला हौदा, त्यात सामान घालून या गाड्या या रस्त्यानं ये-जा करायच्या. त्या बैलगाड्यांच्या दोन्ही चाकांचे पट्टे त्या धुळीतून मस्तपैकी गेलेले दिसायचे. ह्या बैलगाड्या म्हणे पूर्वी लोकांच्या प्रवासाचेही साधन होत्या. मजल-दरमजल करीत पूर्वीचा प्रवास हा बैलगाडीतूनच व्हायचा. रात्र झाली की साधारण एखादं गाव बघून त्या गावाच्या ठिकाणी मुक्काम ठोकायचा. आणि दुसर्‍या दिवशी पहाटे निघायचं. माहेरवाशीणींसाठी तर हा प्रवास खूपच कष्टदायक असायचा. कारण माहेरची ओढ असूनही लवकर हा प्रवास संपत नसायचा आणि सासरी येण्याचा प्रवास मात्र कधी संपायचा तेच कळत नसायचं. या बैलगाड्यांच्या प्रवासाची ही गंमत मोठी होती. राजे-महाराजांच्या काळात या बैलगाड्यांचा प्रवास सुरू होता. घोड्यांवरून रपेट आणि रथातून शिकार किंवा युद्धाच्या प्रसंगी हे राजे लोक जात असावेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र बैलगाडीच चालत असावी.
हळूहळू जगात औद्योगिक क्रांती झाली तशीच भारत देशातही झाली. इंग्रजांचं राज्य आलं, देश गुलामगिरीत गेला. जसजशा दळणवळणाच्या सोई वाढत गेल्या, तसतसं जगही वेगवान होऊ लागलं. हळूहळू शहरातून अशा बैलगाड्या लुप्त होऊ लागल्या. मात्र ग्रामीण भागात त्या अस्तित्व टिकवून होत्या. माझ्या गावात अशा बैलगाड्या होत्या. तांबड्या रस्त्याने धूळ उडवत जात असताना किती मज्जा यायची. आमच्या घरी बहुतेक वेळा बागायतीसाठी लागणारं शेण, चिरे, वाळू, वाणसामान, सिमेंट किंवा गवत आणण्यासाठी या बैलगाड्या यायच्या. पांढर्‍या रंगाचे उंचच उंच बैल, पाठीवरील उंचच उंच वशिंड, मानेखाली लोंबणारी लांब चामडी, त्यांच्या गळ्यात अडकवलेले ते घुंगरू, सारं कसं अगदी मजेदार! ह्या गाड्या आमच्या गोठ्याशेजारी येऊन थांबल्या की त्यांचे मालक त्या बैलांना हलक्या हातांनी त्यांना बांधून ठेवीत आणि ते बैलही समंजसपणे कोणतीच हालचाल न करता, खळखळ न करता त्या ठिकाणी उभे रहात. त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात ङ्गिरवत व त्यांना आमच्याच गोठ्यातील गवत घालीत असत. गाडीमध्ये भरून आणलेलं सर्व सामान उतरून होईस्तोवर ते बैल ते गवत खात आरामात रवंथ करत असायचे. गाडी रिकामी करून झाली की चहा-पाणी घेऊन गाडीचे मालक परत बैलांना गाडीला बांधून निघण्याची तयारी करायचे. त्यावेळी मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही वडिलांची (आम्ही त्यांना दादा म्हणायचो) आणि त्या गाडीच्या मालकांची परवानगी घेऊन गाडीच्या मागच्या हौद्यात बसून साधारण अर्धा किलोमीटरचा प्रवास करत असू. आम्ही आमच्या ‘स्टॉपवर’ आल्यानंतर गाडीवाल्याला थांबायला सांगून परत माघारी ङ्गिरत होतो.
ह्या बैलगाड्या कधी कधी गवताचे उंचच उंच ढीग भरून घरी येत होत्या. गवताचे ते उंचच उंच ढिगारे पाहून मन अचंबित व्हायचं. रस्त्यावर, उंच झाडांवर, रस्त्याशेजारी असलेल्या लहान लहान झुडपांवर गवताच्या काड्या पडायच्या. मात्र त्यावरून गाडीत किती उंचीपर्यंत आणि रुंदीने गवत भरलेलं आहे याचा अंदाज व्हायचा आणि मन थक्क व्हायचं. आजही अशी गवतानं भरलेली ही बैलगाडी डोळ्यांसमोरून हटत नाही.
बैलगाड्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना रस्ता कसा दिसत असावा असा विचार माझ्या मनात नेहमी येत होता. रात्रीच्यावेळी समोरून काळोखातून येणारी बैलगाडी केवळ बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या आवाजावरून ओळखायची. मात्र ज्या बैलांच्या गळ्यात घुंगरू नव्हते त्यांचे काय? सुसाट वेगाने येणार्‍या सायकलींद्वारे अपघात होण्याची दाट शक्यता होती. मग अशावेळी ज्या ठिकाणी त्या गाडीचा मालक बसतो, त्याच्या हातात बैलांची वेसण आणि बैल जास्तच जोराने उतारावरून पळू लागले तर ब्रेक (ज्याला खरडी म्हणतात) ती पायाने लावण्याची सोय असते अशा जागी बसलेला असतो, तिथेच खालच्या बाजूला कंदील लावला जातो. त्या कंदिलाच्या प्रकाशात त्या गाडीवानाचा आणि त्या बैलांचा प्रवास चालत असे. रात्रीचं शांत वातावरण, रातकिड्यांचा किर्रर्र असा घुमणारा आवाज आणि त्यात बैलांच्या घुंगरांचा ‘छुन्नक छुन्नक’ असा आसमंतात घुमणारा मंजूळ आवाज. यामुळे सारं वातावरणच कसं प्रसन्न होत असेल याचा विचार जरी मनात आला तरी वाटायचं. या बैलगाडीतून रात्रीच्या वेळी प्रवास करण्यासारखा जीवनातला दुसरा आनंद नाही असं माझं मत आहे. या प्रसन्न वातावरणात बैलगाडीच्या हौद्यात बसून वरच्या निरभ्र आकाशात चमकणार्‍या चांदण्यांचा आनंद लुटायचा. त्यात जर पौर्णिमेचा दिवस असेल तर जीवनात पौर्णिमाच बहरावी. एक दोन वेळा अशा रम्य ‘पिकनिकचा’ आस्वाद मला घेता आला हे माझं भाग्यच समजतो.
सध्या आमच्या गावात अशा बैलगाड्या दिसत नाहीत. केवळ माझ्या गावातच नव्हे तर बहुतेक ठिकाणी अशा बैलगाड्या दिसायच्या आज बंद झालेल्या आहेत. अर्थात याचं कारण आज सर्वांनाच झटपट पाहिजे असतं. दोन मिनिटांतील मॅगी खाण्याचे दिवस आहेत. त्यामुळे तोच नियम बैलगाड्यांनाही लागू पडतो. आज माझ्या गावात डांबरी रस्ता झालेला आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढलेली आहे. वाहनांतही बदल झालेला आहे. त्यामुळे बैलगाड्यांच्या जागी टेम्पो आलेले आहेत. या गाड्या झटपट येतात, सामान उतरवतात, पैसे घेतात व दुसर्‍या भाड्यासाठी निघून जातात. त्यामुळे अत्यंत संथ आणि रमत गमत प्रवास करणार्‍या बैलगाड्या आज कमी झालेल्या आहेत. असं म्हटलं जातंय की एक ‘बैलगाडी’ समाजातून हद्दपार झाली की बैलगाडीसोबत येणारे सुमारे ६० शब्द मराठी भाषेतून नाहीसे होणार आहेत. एकेकाळी या समाजात बैलगाडी होती असं आम्हांला पुढच्या पिढीला समजावून सांगावं लागणार आहे. पूर्वीच्या काळात रथ होते, टांगे होते असं आम्हांला सांगितलं जात होतं. त्याप्रमाणे ही बैलगाडी होती असं सांगावं लागणार आहे. ही बैलगाडी पुढे कधीतरी शोपीसमध्ये दिसणार आहे. मेट्रोच्या जमान्यात बैलगाडी ही पर्यटनातील एक शोपीस ठरणार आहे. शेवटी परिवर्तन हा नियम आहे. मात्र ते अत्यंत तलम आणि रेशमी दिवस आजच्या झटपट जमान्यात मात्र कुठेच अनुभवता येत नाहीत हीच खरी व्यथा आहे.
………..

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

भिन्न विचारसरणी ः यशाचे गमक

-   प्रा. प्रदीप मसुरकर (मुख्याध्यापक, जीएसएच नामोशी-गिरी) सध्या कोरोनामुळे मुलं आपल्या घरी असतील. त्यांच्याशी सुसंवाद साधा. त्यांच्या विचारांना चालना द्या, त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळा व...

चातुर्मास ः एक आनंददायी पर्व

 नारायणबुवा बर्वे (वाळपई) कोरोना महामारी घालवण्यासाठी भारतासह जगामध्ये हेच भारतीयत्व वापरणे सुरू आहे. शरीर, मन, परिसर स्वच्छ राखणे आणि चातुर्मास पाळणे हेच आहे सोवळे-ओवळे म्हणजेच...

शिक्षण ः अखंड तेवणारा नंदादीप

 सौ. नीता महाजन शाळेतला फळा, खडू, पुस्तक हेच केवळ शिकवण्याचे साधन नाही तर आजच्या या परिस्थितीत मोबाईल, टीव्ही, रेडिओ ही माध्यमे खूप चांगल्या पद्धतीने...

उंच माझा झोका

अक्षता छत्रे कलाकारांचे परिश्रम, त्यांची वेशभूषा, रंगभूषा अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा अधिक सखोलपणे केला गेलेला अभ्यास, तसेच विक्रम गायकवाड व स्पृहा जोशी यांच्या परिश्रमातून सुरेख...

पत्रकार टिळक ः एक कटाक्ष

 प्रा. रमेश सप्रे ‘१ ऑगस्ट’ नियमितपणे येतो नि जागवल्या जातात पत्रकार, लोकनेते, संशोधक असलेल्या लो. टिळकांच्या आठवणी ज्यात प्रामुख्यानं लहानपणच्या शेंगांच्या टरफलांची गोष्ट, नंतरची...