27.6 C
Panjim
Saturday, August 15, 2020

पावसाळा आणि जंताचा त्रास

  • डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

सध्या जंताची औषधे जरी दिली गेली तरी जंक फूडचा शरीरावर होणारा मारा, खालावलेली रोगप्रतिकारशक्ती, चिकन-मटन-मासे तळून खाण्याची सवय, अर्धवट किंवा न शिजलेला भाजीपाला खाण्याची पद्धत, भाज्या-फळांचा आहारात असलेला अभाव, यामुळे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जंत होण्याचे प्रमाण वाढले आहे.

विष्ठेतून जंतांचा प्रसार होतो. जंतांची अंडी, अळ्या विष्ठेतून बाहेर पडतात. ग्रामीण भागात शौचालयांची कमतरता असल्याने उघड्यावर शौच केले जाते. त्यावेळी ही अंडी, अळ्या यांचा प्रसार होतो. पावसाच्या पाण्याने ती इतरत्र पसरतात व पावलांच्या भेगांतून, नखातून, हाताच्या तळव्यावरून ती आपल्या शरीरात प्रवेश करतात.

सर्दी, खोकला, ताप तसेच साथीचे आजार घेऊन तर पावसाळा येतोच पण जंतांचा त्रासही पावसाळ्यात विशेष आढळतो व बरेचदा आपल्याकडून तो दुर्लक्षिला जातो. खरे तर वर्षभरात कधीही जंताचा त्रास होऊ शकतो, पण पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे हा त्रास हमखास वाढतो. शाळकरी मुलांना वर्षातून दोन वेळा जंत होऊ नये म्हणून गोळ्या दिल्या जातात. पण फक्त त्या गोळ्यांवर अवलंबून राहू नये. तसेच जंताचा त्रास फक्त मुलांनाच होतो असे नाही तर मोठ्यांनाही तो होऊ शकतो.
पोटात दुखण्याचा त्रास होत असेल, मळमळल्यासारखे वाटत असेल, त्याचवेळी पोटात एखादा गोळा फिरल्यासारखा वाटत असेल, पातळ जुलाब होत असेल तर जंत झाले असे समजायला हरकत नाही.

एखादे मूल व्यवस्थित आहार घेत असूनही अशक्त दिसत असेल, पोट मोठे दिसत असेल, छोटे मूल तोंडातून सतत फेस काढत असेल, बारीक ताप सतत असेल तरी जंताची शक्यता लक्षात घ्यावी.
चेहर्‍यावर पांढरे डाग दिसत असतील, मुलांना वारंवार खोकला होत असेल, अंगाला खाज सुटत असेल, गुदद्वारापाशी खाज असेल तर त्या मुलाच्या पोटात जंत वाढल्याचे समजावे.
जर पोटात जंत असतील तर आपण खातो त्यातले बरेचसे अन्न पोटातले जंतच खाऊन टाकतात. साहजिकच जंतांचा त्रास असणार्‍यांमधील बरेच लोक अशक्त, कुपोषित होतात. हे जंत रक्त शोषण करतात. तसेच अन्नाचे लोहात रुपांतर करण्यासही अडथळा आणतात. परिणामी शरीराला लोहाची कमतरता निर्माण होते. पूर्वी लहान मुलांच्या पोटात जंत होऊ नये यासाठी घरगुती औषधे दिली जात असत. सध्या औषधे् जरी दिली गेली तरी जंक फूडचा शरीरावर होणारा मारा, खालावलेली रोगप्रतिकारशक्ती, चिकन-मटन-मासे तळून खाण्याची सवय, अर्धवट किंवा न शिजलेला भाजीपाला खाण्याची पद्धत, भाज्या-फळांचा आहारात असलेला अभाव, यामुळे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जंत होण्याचे प्रमाण वाढले आहे.

जंत होण्याची कारणे….
अजीर्णभोजी मधुराम्लनित्यो द्रवप्रियः पिष्टगुडोपभोक्ता |
व्यायामवजीं च दिवाशयनो विरुद्धभुक् संलभते किमींस्तु ॥
– अजीर्ण झाले असता भोजन करणे
– मधुर, अम्ल, रसांचा अधिक प्रमाणात व नेहमी उपयोग करणे
– पिष्टमय व गुळापासून बनवलेले व द्रवरूप असे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे
– व्यायाम न करणे
– दिवसा झोपणे
– विरुद्ध पदार्थांचे सेवन करणे
– नासलेले, शिळे असे पदार्थ खाणे
– असात्म्य अन्नाचे सेवन
– दही-दुधाचे पदार्थ, तिळाची पेंड- आनूप प्राण्यांचे मांस यांसारख्या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन.
– पालेभाज्या हे सर्वच आभ्यंतर कृमीच्या उत्पत्तीचे महत्त्वाचे कारण आहे. पालेभाज्या किडलेल्या व त्यामुळेच कृमीयुक्त असण्याची शक्यता जास्त असते.
– दूषित पाण्याच्या सेवनाने जंत होतात.
– डुक्कर, गाय-बैल यांसारख्या प्राण्यांच्या मांसाच्या सेवनाने जंत होऊ शकतात.
– सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छतेच्या सवयी चांगल्या नसतील तर हातावाटे जंतू शरीरात शिरकाव करतात.
– ज्यांना अनवाणी चालण्याची सवय असते, त्यांच्या पायांच्या भेगांमधून जंतू जाण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात जंत होण्याची शक्यता असते.
जंत कसे होतात?…
विष्ठेतून जंतांचा प्रसार होतो. जंतांची अंडी, अळ्या विष्ठेतून बाहेर पडतात. ग्रामीण भागात शौचालयांची कमतरता असल्याने उघड्यावर शौच केले जाते. त्यावेळी ही अंडी, अळ्या यांचा प्रसार होतो. पावसाच्या पाण्याने ती इतरत्र पसरतात व पावलांच्या भेगांतून, नखातून, हाताच्या तळव्यावरून ती आपल्या शरीरात प्रवेश करतात. पावसाळ्यात जंत होण्याचे, वाढण्याचे हे मुख्य कारण आहे.

जंताचे प्रकार व लक्षणे …
१. कफज कृमी (जंत) –
– सर्व प्रकारच्या कफकर आहारातून यांची उत्पत्ती होत असते. विशेषतः दूध, गूळ, तीळ, मासे, आनुप प्राण्यांचे मांस, करडईचे तेल, अजीर्णाशन, नासलेले पदार्थ, असात्म्य आहार सेवन हे कफज कृमींची कारणे आहेत.
हे कृमी पांढर्‍या रंगाचे, स्नायुप्रमाणे चपटे, काही गोल गांडूळासारखे, लहान किंवा मोठे, आखूड किंवा लांब, धान्याच्या मोडाप्रमाणे लांबट व तोंडाशी वक्रता असणारे.
– कफज कृमी हे आमाशयात असतात. फार वाढले तर ते वर मुखाकडे व खाली गुदाकडे, क्वचित दोन्ही दिशांनी संचार करतात.
– या कृमींमुळे दल्लास (तोंडात लाळ अधिक सुटणे) अरुचि, उलटी, ताप, अनुत्साह, शिंका, सर्दी, कृशता (बारीक होणे, वजन कमी होणे) ही लक्षणे उत्पन्न होतात.
– कफज कृमी हे कोणत्याही वयाच्या व्यक्तीत आढळत असले तरी लहान मुलांमध्ये यांचे प्रमाण अधिक असते. सतत व अधिक प्रमाणात गोड खाणे, माती खाणे, मातीत अनवाणी खेळणे, स्वच्छतेचे नियम न पाळणे वगैरे कारणांमुळे हे आधिक्य असते.
२. सूचिमुख कृमी –
– या जंतांमुळे आतड्यात टोचल्याप्रमाणे वेदना होतात.
– सरक्त मलप्रवृत्ती
– सरक्त उलट्या
– तोंड चिकट होणे
– अरुचि, अग्निमांद्य, तृष्णा अशा प्रकारची लक्षणे दिसतात.
३. रक्तज कृमी –
या प्रकारचे जंत विरुद्धाशन, अजीर्णाशन व पालेभाज्या यांच्या अधिक सेवनाने उत्पन्न होतात. शिळा, नासका व मलिन असा आहार घेणे या कारणांनी रक्तज कृमी उत्पन्न होतात. हे कृमी आकाराने बारीक, गोल, पादहीन असतात.
या प्रकारच्या जंतामुळे सर्वांगाला खाज येते.
४. पुरीषज कृमी –
पूती, क्लिन्न, मलिन असे अन्न खाणे, माती खाणे ही पुरीषज कृमीची विशेष कारणे आहेत.
हे जंत पक्वाशयात उत्पन्न होतात. हे सामान्यतः गुदाकडे जातात पण अति प्रमाणात वाढले तर आमाशयाकडेही जाऊ लागतात. अशा वेळी येणारी ढेकर व निःश्‍वास यांना पुरीषाप्रमाणे दुर्गंधी येऊ लागते.
– हे कृमी मोठे, छोटे, गोल किंवा लांबट आकाराचे असतात.
– या पुरीषज कृमींमुळे द्रवमल प्रवृत्ती किंवा मलावष्टंभ, उदरशूल, कार्श्य, त्वक्‌रुक्षता, पांडूता, रोमहर्ष, अग्निमांद्य आणि गुदकंडू यांसारखी लक्षणे उत्पन्न होतात.
कृमींची सामान्य लक्षणे म्हणून सांगितली जाणारी ज्वर, कंडू, अंगसाद, हृद्रोग ही लक्षणे पुरीषज कृमींमध्ये अधिक प्रमाणात मिळतात.
या प्रकारामध्ये पांडू, उदर, यकृतवृद्धी, अतिसार, शोथ, शोष यांसारखे गंभीर उपद्रवही अनेक वेळा आढळतात.

जंत झाल्यास….
मुले अशख्त वाटतात. लगेच दमतात. शरीराची वाढ खुंटल्यासारखी दिसते. पोट मोठे दिसते.
– पोटात सारखे बारीक दुखत राहते.
– पातळ, भरमसाठ जुलाब होतो. शौचास साफ होत नाही किंवा उलट्या होतात.
– कधी कधी मोठे जंत झाल्यास आतड्यात गोळा फिरल्यासारखे वाटते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी होते व चेहर्‍यावर पांढरे डाग दिसतात.
– गुदद्वाराजवळ खाज येते.
जंतावरील चिकित्सा व उपाय…
जंतावरील चिकित्सा ही तीन प्रकारे करावी लागते. अपकर्षण, प्रकृतिविघात आणि निदानपरिवर्तन. हे तीनही उपक्रम क्रमाने केले पाहिजेत.
– अपकर्षण म्हणजे शोधनोपचारांनी जंत शरीराच्या बाहेर काढून टाकणे यालाच कृमिपातन चिकित्सा म्हणतात.
– प्रकृतिविघात म्हणजे कृमीघ्न चिकित्सा. कृमीघ्न औषधे वापरून कृमी निर्जीव करणे.
– निदान परिवर्जन म्हणजे ज्या कारणांनी कृमींची उत्पत्ती होते ती कारणे टाळणे होय.
अपकर्षणासाठी वमन, बस्ति, विरेचन यांचा यथायोग्य उपयोग करावा. कृमीपातनासाठी कपिकच्छू (खाजकुयली), कुसे जंत पाडण्यासाठी उपयुक्त आहेत. याच्या एका शेंगेवरील कुसे खरवडून काढून गोटीइतक्या गुळामध्ये किंवा मधामध्ये मिसळून रात्री खायला द्यावे. दुसर्‍या दिवशी त्रिफळा चूर्णासारखे सौम्य रेचक द्यावे. याने जंत पडतात. तसेच पळसपर्पटी, एरंडस्नेह, निशोत्तर, कुटकी, कपिला ही औषधेही उपयुक्त ठरतात.
प्रकृतिविघातासाठी तिखट- कडू- तुरट- उष्ण अशा द्रव्यांचा आणि क्षारांचा उपयोग करावा. औषधी द्रव्यांपैकी अल्लातक हे प्रकृतिविघातासाठी म्हणजेच कृमिघ्न म्हणून श्रेष्ठ आहे. वावडिंग, पपईच्या बिया, इंद्रयव, सर्पगंधा, काडेचिराईत आणि कारस्कर ही अन्य काही प्रकृतिविघातक अशी औषधी द्रव्ये होत.

औषधी द्रव्यांपैकी कृमिकुठार, संजीवनी गुटी, आरोग्यवर्धिनी, विडंगासव किंवा विडंगारिष्ट, भल्लातकासव हे काही महत्त्वाचे कल्प कृमीविघातासाठी श्रेष्ठ आहेत.
कोणत्याही व्याधीत अपुनर्भवासाठी निदान परिवर्जन महत्त्वाचे असल्याने अग्निमांद्य होणार नाही व कफाची वृद्धी होणार नाही याची जंतामध्ये काळजी घ्यावी.
जंतावरील काही घरगुती उपाय…
– लहान मुलांना दूध द्यायचे असल्यास दुधामध्ये वावडिंगाच्या बिया टाकून दूध उकळावे. साधारण १ ली. दुधामध्ये ४ वावडिंगाच्या बिया. दोन-तीन तास आधी भिजवून ठेवल्यास उत्तम.
– मोठ्यांसाठी रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घेण्याने जंताचा त्रास कमी होतो.
– शेवग्याच्या शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरेपूड टाकून घेण्याने जंत कमी होतात.
– जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बेडीशोप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून ताक पिल्याने जंत कमी होतात. जंत होऊ नये म्हणून आहारात कढीलिंब, ओवा, हिंग, मिरी, हळद, जिरे, दालचिनीस मोहरी, सैंधव मीठ या गोष्टींचा आवर्जून वापर करावा. शेवगा, मुळा या भाज्या खायला द्याव्या.
‘हे’ प्रत्येकाने करावे असे…..
सर्व जंतांचे जीवनचक्र अस्वच्छतेवर अवलंबून असते. मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावली गेली तर जंतांची बाधा सहसा होत नाही. म्हणून घरोघरी सुरक्षित शौचालये हाच यावरचा मुख्य उपाय आहे.
– शौचावरून आल्यावर हात-पाय साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावेत.
– नखे वाढायच्या आत लगेच कापावीत.
– खाण्याआधी हात स्वच्छ धुणे उत्तम.
– चिकन, मटणसारखे मांस नीट न शिजवल्यामुळे विशिष्ट प्रकारचे जंत तयार होतात. म्हणून मांस नीट शिजवून खाणे, तेलात तळून नव्हे!
– खारवलेले सुके मांस-मासे खाताना स्वच्छतेची योग्य काळजी घ्यावी. अशा पदार्थांवर चांगला अग्निसंस्कार झाल्याशिवाय पदार्थ खाऊ नये.
– भाज्या, फळे पाण्यात खाण्याचा सोडा टाकून किंवा मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवावी. पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्यांचा वापर कमी करावा किंवा भरपूर पाण्याने भाज्या स्वच्छ धुवाव्यात.
शेवगा आणि लसूण या आजारात विशेष पथ्यकर आहेत. त्यामुळे त्यांचे सेवन करावे.
आरोग्यविभागातफेर् देण्यात येणार्‍या जंतावरच्या गोळ्यांचे जरूर सेवन करावे पण प्रतिबंधक उपाय म्हणून वरील काही गोष्टींचा अवलंब जरूर करावा.

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

उपयुक्त टाकळा, तांदुळजा भाजी

 डॉ. मनाली म. पवार (सांतइनेज-पणजी) टाकळ्याच्या बिया उत्तम कृमीनाशक आहेत तर तांदुळजाची भाजी थंड असते. त्यामुळे हातापायांची जळजळ, लघवीला दाह, डोळे लाल होणे वगैरे तक्रारींवर...

॥ मनःशांती उपनिषदातून ॥ थेंबुटा सागरी बुडाला…

 प्रा. रमेश सप्रे ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे आणि केवळ ध्वनी-शब्द-वाक्यांचा उच्चार करत राहणं म्हणजे वाचन नव्हे. श्रवण म्हणजे लक्ष देऊन (अवधानपूर्वक) भावार्थ लक्षात घेऊन...

सणांमागचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे! योगसाधना – ४७० अंतरंग योग – ५५

 डॉ. सीताकांत घाणेकर ‘टिळा’ ही मस्तकाची पूजा नाही तर भावाचे विचार व बुद्धी यांच्यावरील विश्‍वासाचे दर्शन आहे. या सामान्य भासणार्‍या क्रियेत दृष्टिपरिवर्तनाची महान प्रक्रिया...

अपेक्षित काळजी हृदयाची घेतो का?  भाग – २

-   डॉ. सुरज स. पाटलेकर (श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव ) हृद्रोगामध्ये रोग्यास पूर्ण विश्रांतीची गरज असते. आहार हा पातळ, पचायला हलका, संतर्पण व पोषण करणारा हवा....

साखरे बद्दलचे समज/गैरसमज

 डॉ. स्वाती हे.अणवेकर (म्हापसा) जी व्यक्ती भरपूर साखर खाते त्या व्यक्तीला वारंवार हायपोग्लायसेमिया होतो. अर्थात ही त्या व्यक्तीची प्रि-डायबिटीक स्टेज असते. ह्यात त्या व्यक्तीची साखर...