27 C
Panjim
Saturday, August 15, 2020

जीवन कुणाला कळलेय (?)

  • विवेक कुलकर्णी

माणसाचे जीवन पुढे पुढे सरकत असते, तशी एक अनामिक भीति त्याच्या मनात हळूहळू घर करायला लागते. ती भीति म्हणजे मरणाची, मृत्यूची. तो केव्हा येणार, कसा येणार, कुठे येणार याविषयी काहीही माहिती नाही पण तो येणार हे निश्चित. कदाचित पुढच्या क्षणीही येईल.

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे जगणे सुरू होते आणि त्याचा मृत्यू होतो तेव्हा हे जगणे संपते म्हणून माणसाचा जन्म ते मृत्यू या दरम्यानचा काळ म्हणजे त्याचे जीवन. लहानपणी माणूस परावलंबी असतो. त्याच्या जीवनाच्या कक्षा मर्यादित असतात पण तो जेव्हा मोठा होतो, स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबनाने जगायला लागतो. त्याला भली-बुरी माणसे भेटतात. भले-बुरे अनुभव येतात. तेव्हा त्याचे खरे जगणे म्हणजे जीवन सुरू होते.

मग काहींचे जगणे फार सुखाचे तर काहींचे अगदी कष्टप्रद. काहींचे स्वतःपुरते तर काहींचे संपूर्ण जीवन दुसर्‍यासाठी. पण प्रत्येक माणसाला हे जीवन प्रत्येक क्षणाला भोवतालच्या परिस्थितीशी, माणसाशी तडजोड म्हणजे समायोजन करायला लावते. कारण जीवन ही स्वतःच एक अखंड चालणारी समायोजनाची प्रक्रिया आहे. म्हणून म्हटले जाते- ‘‘लाईफ इटसेल्फ इज अ कंटिन्युअस प्रोसेस ऑफ ऍडजस्टमेंट अँड यु हॅव टू ऍडजस्ट ऍट ईच अँड एव्हरी मूमेंट!’’

या जीवनाचे वर्णन अनेकांनी अनेक प्रकारे केले आहे. विभिन्न लोक विभिन्न दृष्टिकोनातून जीवनाकडे बघतात व आपापल्या वृत्तीनुसार जगतात. प्रसिद्ध कवी ग.दि.माडगूळकर जीवनाला जरतारी वस्त्राची उपमा देतात. हे वस्त्र एक धागा सुखाचा आणि शंभर धागे दुःखाचे.. अशा धाग्यांनी विणले आहे. त्याचे तीन प्रकार आहेत- बालपणीची मुकी अंगडी तर तारुण्याचे वस्त्र रंगीबेरंगी, मौजेचे, मस्तीचे आणि शेवटी वृद्धपणी जीर्ण झालेली शाल! प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर म्हणतो, ‘‘जग ही एक रंगभूमी आहे आणि माणूस या रंगभूमीवर विविध भूमिका करत असतो त्या जगण्यासाठीच. जीवन व्यतीत करण्यासाठीच. आपली भूमिका आली की पात्रे रंगभूमीवर येतात व भूमिका संपली की जातात.. पुन्हा न येण्यासाठी.’’
जीवनाला प्रवासाची उपमा दिली आहे. या प्रवासाचा आरंभ जन्माच्या वेळी होतो आणि शेवट मृत्युसमयी! पण यात एक वैशिष्ट्य आहे. प्रवासाचा आरंभ आधी माहीत होतो पण शेवट कुणालाच कळत नाही. अगदी त्या प्रवाशालासुद्धा. आपण जेव्हा एखाद्या वाहनातून प्रवास करतो तेव्हा वाटेत आपल्याला अनेक प्रकारचे प्रवासी भेटतात. आणि आपापले ठिकाण आले की उतरून जातात. पुन्हा त्यांची भेट होईल याची शाश्‍वती नसते. काही मुद्दाम भेटतात, काही योगायोगाने भेटतात आणि मृत्यूने दुरावतात.
‘‘यथा काष्ठम् च काष्ठम् च समेयाताम् महादधौ|’’

समुद्रात योगायोगानेच दोन ओंडके एकत्र येतात आणि एका लाटेने एकमेकांपासून दूर जातात. त्याप्रमाणे माणसं एकत्र येतात आणि आपल्या आठवणी मागे ठेवून जातात. एक हिंदी कवी म्हणतो…
जीवन के सफर में राही, मिलते है बिछड जाने को
और दे जाते है यादे, तनहाई में तडपाने को
जीवनाच्या प्रवासात माणसं भेटतात ती वियोगासाठीच आणि त्यांच्या मागे उरणार्‍यांना वियोगाचे, विरहाचे दुःख त्यांच्या आठवणींमध्ये पोळायला ते देऊन जातात.
सर्वांचेच जीवन ऐहिक समृद्धीने संपन्न असते असे नाही. असे भाग्यवंत फारच थोडे. सर्वसामान्य माणसाचे जीवन कष्टप्रद, दगदगीचे, अडचणींनी भरलेले, तीव्र संघर्षाचे असते. रोज कालमानाप्रमाणे निर्माण होणार्‍या समस्या, दिवसेंदिवस तीव्र होत जाणारा जीवनसंघर्ष, प्रापंचिक अडचणी, समस्या सोडवण्यात एकेकाचे सारे आयुष्य खर्ची पडते. म्हणून दुःखी होऊन, हताश होऊन, असहायपणे तो कधीकधी म्हणतो…
अजुनी चालतोच वाट माळ हा सरेना
विश्रांती स्थान केव्हा यायचे कळेना
असा माणूस जीवनाला ओसाड माळाची उपमा देतो आणि आता यातून मरणाशिवाय सुटका नाही म्हणून विश्रांतीस्थानाची प्रतीक्षा करत असतो.

याउलट काही माणसं बिनधास्त असतात. आज मिळाले आहे त्याचा उपभोग घेऊ, उद्या कोणी पाहिला? शिवाय काळजी, चिंता करून होणारे टळणार थोडेच आहे!
जगणे आमचे नका विचारू आम्ही पाखरे भटकी
आज इथे, उद्या तिथे मजेत जगायचे. प्रपंचातील व्यावहारिक बाजू क्षणभर बाजूला ठेवून मस्तीत जगावे. देणे-घेणे तर रोजचेच आहे. आहे त्यात सुख-समाधान मानून जगूया म्हणून ती आनंदाने गातात.
‘‘जीवनगाणे गातच रहावे, देणे घेणे विसरुनी जावे, पुढे पुढे चालावे…’’
माणसाचे जीवन पुढे पुढे सरकत असते, तशी एक अनामिक भीति त्याच्या मनात हळूहळू घर करायला लागते. ती भीति म्हणजे मरणाची, मृत्यूची. तो केव्हा येणार, कसा येणार, कुठे येणार याविषयी काहीही माहिती नाही पण तो येणार हे निश्चित. कदाचित पुढच्या क्षणीही येईल. त्यावेळी हे सगळे येथे टाकून जावे लागणार. पुढे काय होणार… या मरणाच्या कल्पनेने जीव घाबरतो. कासाविस होतो. पण मरण तर येणारच आहे मग त्याला घाबरून ते थोडेच टळणार! त्यापेक्षा त्याला यायचे तेव्हा येऊदे. तोपर्यंत त्याच्या भीतिच्या छायेत जगण्यापेक्षा हातात आहे तेवढे आयुष्य तरी मजेत जगूया असे म्हणणारी माणसे म्हणतात – ‘‘हे जीवन एक आनंददायी सफर आहे. उद्या काय होणार कोणाला माहीत? मरण येणार आहे येऊ द्या. जीव जाणार आहे, जाऊद्या. अशा गोष्टींची भीति कशाला?’’
जिंदगी एक सफर हैं सुहाना, यहॉं कल क्या हों किसने जाना?
मौत आनी हैं आयेगी इक दिन, जान जानी हैं जायेगी इक दिन
ऐसी बातोंसे क्या घबराना??
तेव्हा न घाबरता मजेत रहा. मस्तीत जगा.

तसेच जीवनामध्ये विविध प्रकारची माणसं भेटतात- सुष्ट अन् दुष्ट. सुष्ट प्रवृत्ती आणि दुष्ट प्रवृत्ती यांचा झगडा सतत चालू असतो. दुर्बलांना सबल त्रास देत असतात. म्हणून एक कवी जीवनात सावध रहायला सांगतो…
‘‘जीवन सुखदुःखाची जाळी, त्यात लटकले मानव कोळी
एकाने दुसर्‍यास गिळावे, हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा
म्हणून तू जपून टाक पाऊल जरा, जीवनातल्या मुसाफिरा!’’
जीवनाला सुखदुःखाच्या जाळ्याची उपमा दिली आहे. या जाळ्याला मानवरूपी कोळी लटकले आहेत. मोठा कोळी लहान कोळ्याला गिळतो, म्हणून मानवा सावध रहा. प्रत्येक पाऊल सावधगिरीने, जपून टाक… असा उपदेश या ओळीतून दिसतो.
काही लोकांचे जीवन म्हणजे विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी केलेली अविरत, अविश्रांतपणे केलेली धडपड. ‘स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसर्‍यासाठी मेलास तरी जगलास’- या वृत्तीने ही माणसं मानवाच्या कल्याणासाठी झटत असतात. ती मेली तरी आपल्या कार्याने अमर राहतात. ‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’ ही उक्ती सार्थ करून दाखवतात.

मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो,
जीवन त्यांना कळले हो…
पण त्यांचे जीवन कळणे हे सामान्यांच्या आवाक्यातले नसते.
काही माणसं कमालीची सहनशील असतात. आपल्यावर आलेल्या संकटांचा, दुःखांचा ती बाऊ करत नाहीत किंवा प्रदर्शनही करीत नाहीत. निमूटपणे सगळे सोसत राहतात आणि आपली आनंदी वृत्ती न सोडता इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना जीवनयात्रा आनंदाची करणारे आनंदयात्री या नावाने कवी मंगेश पाडगावकर संबोधतात. त्यांची वृत्ती कशी असते हे सांगताना कवी म्हणतात…
हलकेच टाकिले काढून कंटक मी पायीचे
स्वरात विणले सर मी स्वप्नांचे
हासत केला मी दुःखाचा स्वीकार
वर्षले चांदणे पिऊन अंधार
प्रकाशाचे गीत अवसेच्या रात्री
आनंदयात्री, मी आनंदयात्री!

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

भिन्न विचारसरणी ः यशाचे गमक

-   प्रा. प्रदीप मसुरकर (मुख्याध्यापक, जीएसएच नामोशी-गिरी) सध्या कोरोनामुळे मुलं आपल्या घरी असतील. त्यांच्याशी सुसंवाद साधा. त्यांच्या विचारांना चालना द्या, त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळा व...

चातुर्मास ः एक आनंददायी पर्व

 नारायणबुवा बर्वे (वाळपई) कोरोना महामारी घालवण्यासाठी भारतासह जगामध्ये हेच भारतीयत्व वापरणे सुरू आहे. शरीर, मन, परिसर स्वच्छ राखणे आणि चातुर्मास पाळणे हेच आहे सोवळे-ओवळे म्हणजेच...

शिक्षण ः अखंड तेवणारा नंदादीप

 सौ. नीता महाजन शाळेतला फळा, खडू, पुस्तक हेच केवळ शिकवण्याचे साधन नाही तर आजच्या या परिस्थितीत मोबाईल, टीव्ही, रेडिओ ही माध्यमे खूप चांगल्या पद्धतीने...

उंच माझा झोका

अक्षता छत्रे कलाकारांचे परिश्रम, त्यांची वेशभूषा, रंगभूषा अशा छोट्या-मोठ्या गोष्टींचा अधिक सखोलपणे केला गेलेला अभ्यास, तसेच विक्रम गायकवाड व स्पृहा जोशी यांच्या परिश्रमातून सुरेख...

पत्रकार टिळक ः एक कटाक्ष

 प्रा. रमेश सप्रे ‘१ ऑगस्ट’ नियमितपणे येतो नि जागवल्या जातात पत्रकार, लोकनेते, संशोधक असलेल्या लो. टिळकांच्या आठवणी ज्यात प्रामुख्यानं लहानपणच्या शेंगांच्या टरफलांची गोष्ट, नंतरची...