25 C
Panjim
Saturday, August 15, 2020

गुणी नेत्याचा अंत

कोरोनाने राज्यात काल आठवा बळी घेतला, तो माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश कुसो आमोणकर यांचा. एक विनम्र, सुसंस्कृत नेता कोरोनाच्या कहरात हकनाक बळी गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाने आधीच धास्तावलेल्या राज्याच्या जनतेला मोठा हादरा देणारा हा मृत्यू आहे यात शंका नाही. आमोणकर गेली काही वर्षे राजकीय विजनवासात होते. त्यांची जागा भरून काढून विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले स्थान भक्कम केल्यापासून डॉ. आमोणकर सार्वजनिक जीवनातून दूरच फेकले गेले होते. त्यात स्वतः डॉक्टर असूनही गंभीर व्याधीने ग्रासल्याने त्यांची तिच्याशी निकराची झुंज सुरू होती. मात्र, अचानक उद्भवलेल्या कोरोनाने त्यांच्यावर अनपेक्षित घाला घातला आहे. साखळीवासीयांना शोकाकुल करणारी ही घटना आहे.
पाळी मतदारसंघातून ९९ च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली डॉ. आमोणकरांचे नेतृत्व पुढे आले. गोव्याच्या राजकीय क्षितिजावर भाजपा नुकताच उदय पावत होता. फ्रान्सिस सार्दिन यांच्या सरकारमध्ये मनोहर पर्रीकर यांच्या चाणक्य नीतीच्या बळावर भाजपा सामील झाला तेव्हा त्यामध्ये आमोणकर यांच्याकडे ते स्वतः डॉक्टर असल्याने आरोग्यमंत्रीपद देण्यात आले. पुढे सार्दिन यांचेच सरकार पाडून भाजपने स्वतःचे सरकार स्थापन केले, त्या राजकीय धुमश्चक्रीचे सुकाणू मनोहर पर्रीकर यांच्या हाती होते. पर्रीकरांच्या पहिल्यावहिल्या सरकारमध्येही आरोग्यमंत्री म्हणून डॉ. आमोणकर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
निवडणुकीमध्ये जय – पराजय असतोच. २००२ मध्ये ते झोकात पुनरागमन करू शकले, परंतु २००७ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांच्या राजकीय प्रभावाला ओहटी लागत गेली. पर्रीकरांनी बदलत्या वार्‍याची दिशा ओळखत आमोणकरांना पर्याय शोधण्यास सुरूवात केली आणि डॉ. प्रमोद सावंत यांच्यासारख्या नव्या कोर्‍या चेहर्‍याला पुढे आणले. त्याच्यावर आपली छत्रछाया धरली. पर्रीकरांनी गावोगावी दगडांना शेंदूर फासून राजकारणात पुढे आणले, निवडणुकांतून संधी दिली. परंतु व्यक्तिमत्त्व, नेतृत्वगुण, वक्तृत्व, व्यवस्थापन कौशल्य आदींमध्ये चुणूक केवळ काही मोजक्या लोकांमध्येच आहे याची पर्रीकरांना जाणीव होती. त्यामुळे आपले भावी वारसदार ठरू शकतील अशा काही जणांना त्यांनी स्वतःच्या छायेत घेतले, त्यांची जडणघडण केली, त्यामध्ये डॉ. सावंत हे एक होते. पर्रीकरांच्या उत्तरकाळामध्ये आपला वारसदार म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला देखील पुढे आणले नाही, परंतु सावंत यांच्यावर मेहनत घेतली. त्यांना ती किती पेलता आली हा वेगळा भाग, परंतु या घडामोडींमध्ये डॉ. सुरेश आमोणकर नावाचा पक्षाचा एक मोहरा दुखावला गेला, दूर फेकला गेला तो कायमचा. राजकीय सारीपाटात आमोणकर पिछाडीवर फेकले गेले. हा अपमान जिव्हारी लागलेल्या आमोणकरांनी २०१२ च्या निवडणुकीमध्ये अपक्ष उभे राहून पक्षालाच आव्हान देण्याचा निरुपायाने प्रयत्न केला, परंतु उगवत्या सूर्याला दंडवत ठोकण्याच्या जनप्रवृत्तीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. जोवर सत्ता हाती असते, किमान सत्ता डोळ्यांपुढे दिसत असते, तोवर जनता मागे मागे असते. सत्तेने पाठ फिरवली की जनताही पाठ फिरवते हा दाहक अनुभव त्या निवडणुकीमध्ये आमोणकरांना घ्यावा लागला.
सुभाष वेलिंगकरांनी गोवा सुरक्षा मंचाचा घाट घातला आणि हट्टाने आपले उमेदवार २०१७ च्या निवडणुकीत उभे केले, तेव्हा साखळीच्या जागेवर डॉ. आमोणकरांना उभे करण्यात आले, परंतु त्या निवडणुकीत आमोणकर थेट तिसर्‍या स्थानी फेकले गेले आणि त्यांच्या राजकीय क्षितिजावरचा सूर्य कायमचा मावळला.
आपल्या नम्र, विनयशील स्वभावाने डॉ. आमोणकरांनी माणसे जोडली, आपलीशी केली. राजकारणात उच्च पदे भूषविण्याची संधी त्यांना लाभली, परंतु सत्तेची गुर्मी आणि मुजोरी कधी त्यांच्यात दिसली नाही. शांत, सौम्य बोलणे, समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेणे या गुणांमुळे त्यांनी आपल्या मतदारांना आपलेसे केले होते. अशा या गुणी नेत्याचा हा असा अकाली अस्त व्हावा ही दुर्दैवाची बाब आहे. नियती ही शेवटी आपली अतर्क्य खेळी खेळत असते. त्या एका फटक्यामध्ये हा उमदा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
दिवसागणिक एकेक बळी घेत चाललेल्या कोरोनाला रोखण्यासाठी राजकीय नेतृत्वाला कसोशीने पावले टाकावीच लागतील हेच जणू हा मृत्यू सरकारला परोपरीने सांगतो आहे. मुरगावचे नगरसेवक पास्कोल डिसोझा यांचा कोरोनाने घात केला. त्या पाठोपाठ डॉ. आमोणकर यांचा बळी गेला आहे. अजून किती बळी कोरोना राज्यात घेणार आहे?

STAY CONNECTED

850FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

राज्यात ४७६ नवे कोरोना रुग्ण

>> दोघांचा मृत्यू, बळींची संख्या ९३, एकूण रुग्णसंख्या १०,९७० राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून काल नवे ४७६...

प्लाझ्मा उपचारामुळे दोघे कोरोनामुक्त

>> गंभीर कोरोनाबाधितांवर गोमेकॉत उपचार ः आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...

पहिल्या मानवी चाचणीत भारतीय लस सुरक्षित

कोरोनासंबंधी भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन ही लस देशातील १२ शहरांतील ३७५ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. या लसीच्या पहिल्या...

ALSO IN THIS SECTION

अजून खूप जायचे आहे पुढे…

प्रिय वाचकहो, नमस्कार!आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे....

विदारक…

आम्ही यंव करतो आहोत, त्यंव करतो आहोत असे भले नेते सांगत असले, तरी राज्यातील कोरोनाची स्थिती आता सरकारच्या पूर्ण हाताबाहेर गेली आहे....

पायलट परतले, पण..

राजस्थानातील कॉंग्रेसचे तरुण तुर्क नेते सचिन पायलट यांचे भरकटलेले आणि ज्योतिरादित्य शिंद्यांच्या पावलावर पाऊल टाकत भविष्यात भाजपच्या विमानतळावर उतरू पाहणारे विमान अखेर निमूटपणे कॉंग्रेसच्या...

उत्सव साजरा करताना

  कोरोनाचे विघ्न सर्वत्र फैलावत चालले असताना विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाचे वेध गोमंतकाला लागले आहेत. हा शुभंकर श्रीगणेश येईल आणि कोरोनाचा कहर दूर सारील अशी जनतेला...

हे असेच चालायचे?

ट्रकांच्या पाठीमागे ‘हे असेच चालायचे’ असा एक संदेश अनेकदा रंगवलेला दिसतो. गोव्यातील कोरोनाची परिस्थिती पाहिली तर ‘हे असेच (रामभरोसे) चालायचे’ असेच एकूण चित्र दिसते...